बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘वाळवण महोत्सवा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; महिला बचत गटांच्या उत्पादनांना मोठी पसंती

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागातर्फे आयोजित ‘वाळवण महोत्सवा’ला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या पारंपरिक वाळवण पदार्थांना मोठी मागणी असून महिला सक्षमीकरणाला चालना देणारा हा उपक्रम ठरत आहे.

May 11, 2026 - 22:57
 0  12
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘वाळवण महोत्सवा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; महिला बचत गटांच्या उत्पादनांना मोठी पसंती
बृहन्मुंबई महानगरपालिका, वाळवण महोत्सव, महिला बचत गट,

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘वाळवण महोत्सवा’ला मुंबईकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागांमध्ये सुरू झालेल्या या महोत्सवात महिला बचत गटांनी तयार केलेल्या पारंपरिक खाद्यपदार्थांना मोठी पसंती मिळत आहे. हा महोत्सव मंगळवार, १२ मे २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.

महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष श्रीमती मीनल तुर्डे, संचालक (नियोजन) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, सहायक आयुक्त श्री. योगेश देसाई आणि सहायक आयुक्त श्रीमती समरिन सैय्यद यांनी विविध प्रशासकीय विभागांतील महोत्सवाला भेट देऊन महिला बचत गटांच्या कार्याचे कौतुक केले.

महानगरपालिकेच्या महिला सक्षमीकरण उपक्रमांतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘वाळवण महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.

महिला बचत गटांनी तयार केलेल्या शेवया, पापड, कुरडई, लोणची, सांडगे, मसाले, सुक्की मच्छी आणि इतर पारंपरिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स महोत्सवात उभारण्यात आले आहेत. उत्पादनांची गुणवत्ता, आकर्षक सादरीकरण आणि पारंपरिक चवीमुळे नागरिकांकडून या पदार्थांना मोठी मागणी मिळत आहे.

महिला बचत गटांच्या महिलांशी संवाद साधताना श्रीमती मीनल तुर्डे यांनी त्यांच्या मेहनतीचे, उद्योजकतेचे आणि पाककौशल्याचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे महिलांना आर्थिक बळ मिळत असून पारंपरिक खाद्यसंस्कृती जपण्यासही मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला बचत गटांच्या उत्पादनांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0