दहिसरमध्ये नामांकित दूध कंपन्यांच्या दुधात भेसळ करणारा आरोपी अटकेत; ४७० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा (युनिट-१२) आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत दहिसर पूर्व येथे नामांकित कंपन्यांच्या दूध पिशव्यांमध्ये अस्वच्छ पाणी मिसळून विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली. कारवाईत ४७० लिटर भेसळयुक्त दूध, रिकाम्या दूध पिशव्या आणि भेसळीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले.

Jul 9, 2026 - 19:53
Jul 9, 2026 - 19:55
 0  7
दहिसरमध्ये नामांकित दूध कंपन्यांच्या दुधात भेसळ करणारा आरोपी अटकेत; ४७० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट
दूध भेसळ, दहिसर बातमी, मुंबई पोलीस, गुन्हे प्रकटीकरण शाखा

मुंबई ब्यूरो: अनिल सावरे 

मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा (युनिट-१२) आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत दहिसर पूर्व परिसरात नामांकित दूध कंपन्यांच्या पिशव्यांमध्ये अस्वच्छ पाणी मिसळून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे ४७० लिटर भेसळयुक्त दूध, रिकाम्या दूध पिशव्या, भेसळीसाठी वापरलेले साहित्य आणि मोबाईल फोन असा एकूण ₹३९,७५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दहिसर पूर्व येथील आर.एन. ०८८/३९, दुबे चाळ क्रमांक २, राजेश कंपाऊंड परिसरातील एका खोलीत नामांकित कंपन्यांच्या दूध पिशव्यांमध्ये अस्वच्छ पाणी मिसळून त्या पुन्हा सील करून ग्राहकांना विक्रीसाठी तयार केल्या जात असल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे ९ जुलै २०२६ रोजी पहाटे गुन्हे प्रकटीकरण शाखा (युनिट-१२) आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त छापा टाकला. छाप्यात आरोपी अमूल (ताजा, गोल्ड) आणि गोकुळ या कंपन्यांच्या मूळ दूध पिशव्या कापून त्यातील काही दूध काढून त्यामध्ये अस्वच्छ पाणी मिसळत असल्याचे उघड झाले. त्यानंतर त्या पिशव्या पुन्हा सील करून त्या मूळ कंपनीच्या असल्याचा भास निर्माण करून विक्रीसाठी तयार करण्यात येत होत्या.

कारवाईदरम्यान ४७० लिटर भेसळयुक्त दूध, ३२७ रिकाम्या दूध पिशव्या, भेसळीसाठी वापरलेले साहित्य आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला. नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणारे हे भेसळयुक्त दूध घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा (युनिट-१२) करत आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0