NEET-UG 2026 परीक्षेसाठी गडचिरोलीत केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश; सेवा हक्क दिनानिमित्त अधिकाऱ्यांना शपथ
गडचिरोली जिल्ह्यात 3 मे रोजी होणाऱ्या NEET-UG 2026 परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच सेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांना पारदर्शक सेवा देण्याची शपथ देण्यात आली.
गडचिरोली : राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) मार्फत 3 मे 2026 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत होणाऱ्या NEET (UG) 2026 परीक्षेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.
जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पांडा यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत परीक्षा केंद्रांच्या 200 मीटर परिसरात मनाई आदेश लागू केले आहेत. परीक्षार्थींना शांत, सुरक्षित आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी हा या आदेशाचा उद्देश आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात झेरॉक्स मशीन, फॅक्स, एसटीडी बूथ परीक्षा कालावधीत बंद राहतील. मोबाईल फोन, लॅपटॉप, कॅमेरा, पेजर, टेपरेकॉर्डर यांसारख्या साधनांच्या वापरास मनाई करण्यात आली आहे.
तसेच घोषणाबाजी, गोंधळ, वाद्य वाजवणे, भाषण करणे, पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमणे, शस्त्र किंवा धोकादायक वस्तू बाळगणे, स्फोटक पदार्थ आणणे यांनाही बंदी घालण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर अनधिकृत व्यक्ती व वाहनांना प्रवेश नसेल.
दरम्यान, सेवा हक्क दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत नागरिकांना वेळेत, पारदर्शक आणि सुलभ सेवा देण्याची शपथ देण्यात आली.
जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शासनाच्या सेवा निर्धारित कालावधीत पात्र नागरिकांपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. सेवा वितरणात विलंब, अडथळा किंवा भ्रष्टाचार होऊ नये यासाठी सर्वांनी जबाबदारीने कार्य करावे.
प्रामाणिकपणा, निःस्वार्थ वृत्ती आणि संवेदनशीलता या मूल्यांच्या आधारे काम केल्यास नागरिकांचा प्रशासनावर विश्वास अधिक दृढ होईल, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे तसेच महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0