गणेशोत्सव राज्य महोत्सवासाठी व्यापक कृती आराखडा तयार करा; मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर यंदाचा उत्सव अधिक व्यापक आणि लोकसहभागातून साजरा करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

Jul 23, 2026 - 21:54
 0  6
गणेशोत्सव राज्य महोत्सवासाठी व्यापक कृती आराखडा तयार करा; मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश
गणेशोत्सव राज्य महोत्सव, आशिष शेलार

मुंबई | प्रतिनिधी : नरेश शिंदे 

राज्य शासनाने गणेशोत्सवाला 'राज्य महोत्सव' म्हणून घोषित केल्यानंतर यंदाचा उत्सव अधिक भव्य, सुबद्ध आणि लोकसहभागातून साजरा करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने व्यापक कृती आराखडा तयार करावा, तसेच यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) तातडीने जारी करावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत गणेशोत्सवाच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

सर्व विभागांचा सक्रिय सहभाग अनिवार्य

मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, यंदाच्या गणेशोत्सवासाठी जिल्हाधिकारी, महानगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पोलीस, पर्यटन, उद्योग, शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांनी विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करून एकसंध कृती आराखडा तयार करावा. प्रत्येक विभागाने किमान एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवून उत्सवाला राज्यव्यापी स्वरूप द्यावे.

राज्यभर एकसमान ओळख निर्माण होणार

गणेशोत्सव राज्य महोत्सवासाठी अधिकृत लोगो, गीत, माहितीपत्रके, शैक्षणिक व जनजागृती साहित्य तयार करून राज्यातील सर्व विभागांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यभर आयोजित होणाऱ्या सर्व शासकीय कार्यक्रमांमध्ये या अधिकृत साहित्याचा एकसमान वापर करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.

पर्यावरणपूरक आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना

बैठकीत शाडूच्या मूर्ती तयार करणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, हस्तकला प्रदर्शन, महाविद्यालयीन युवकांचा सहभाग, शालेय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक जनजागृती अभियान आणि लोककलेला चालना देणारे विविध उपक्रम राबविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

तसेच भजन मंडळे, ढोल-ताशा पथके आणि नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध योजनांद्वारे प्रोत्साहन देण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.

CSR आणि स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग

उद्योग क्षेत्रातील कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीच्या माध्यमातून सांस्कृतिक उपक्रमांना सहकार्य मिळविणे, मराठी मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग वाढविण्याचे नियोजनही बैठकीत करण्यात आले.

१० ते १२ दिवसांत कृती आराखडा अंतिम

बैठकीच्या शेवटी मंत्री आशिष शेलार यांनी पुढील १० ते १२ दिवसांत व्यापक कृती आराखडा आणि शासन निर्णय (जीआर) अंतिम करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

राज्य महोत्सवाच्या स्वरूपात साजरा होणारा यंदाचा गणेशोत्सव महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, लोककला आणि सामाजिक एकात्मता अधिक प्रभावीपणे देश-विदेशात पोहोचविणारा ठरेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0