महाराष्ट्र दिनानिमित्त दिल्लीतील महाराष्ट्र सदनात ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगतदार मेजवानी
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध लोककला, लावणी, कोळी नृत्य आणि राज्यगीताच्या सादरीकरणाने राजधानीत महाराष्ट्र संस्कृतीचा जल्लोष अनुभवायला मिळाला.
नवी दिल्ली, दि. २ : महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून राजधानीत महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा, कला आणि संस्कृतीचे दर्शन घडले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र परिचय केंद्र आणि महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला अनेक मान्यवर, वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासकीय सेवेतील व्यक्ती उपस्थित होत्या.
या सोहळ्यास राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला, नितीन खाडे (भा.प्र.से.), धनंजय घनवट (भा.पो.से.), सहाय्यक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे तसेच सदन व्यवस्थापक प्रमोद कोलपाते यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे राज्यगीत “जय जय महाराष्ट्र माझा” याच्या भारावून टाकणाऱ्या सादरीकरणाने झाली. यामुळे संपूर्ण सभागृहात अभिमान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
त्यानंतर मुंबईतील अमेय पाटील डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी महाराष्ट्राच्या विविध लोककलांचे मनमोहक सादरीकरण केले. यामध्ये गणेश वंदना, कोळी नृत्य, नखरेल लावणी, वासुदेव तसेच इतर पारंपरिक लोकनृत्यांचा समावेश होता.
या रंगतदार कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. महाराष्ट्र दिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्र संस्कृतीचा जल्लोष अनुभवायला मिळाल्याने उपस्थितांनी कलाकारांचे जोरदार कौतुक केले.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0