जोगेश्वरी पोलिसांची कारवाई; 38 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस अटक

जोगेश्वरी पोलिसांनी 1988 मधील गुन्ह्यात तब्बल 38 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला डोंबिवली परिसरातून अटक केली. आरोपीविरुद्ध अंधेरी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

Jul 30, 2026 - 19:47
 0  10
जोगेश्वरी पोलिसांची कारवाई; 38 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस अटक
जोगेश्वरी पोलीस, फरार आरोपी अटक, 38 वर्षांपासून फरार, अजामीनपात्र वॉरंट

मुंबई ब्यूरो | अनिल सावरे 

मुंबई, दि. 30 : जोगेश्वरी पोलीस ठाण्यात 1988 साली दाखल झालेल्या गुन्ह्यात तब्बल 38 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरुद्ध अंधेरी येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट (NBW) तसेच जाहिरनामा जारी केला होता.

जोगेश्वरी पोलीस ठाण्यात सन 1988 मध्ये भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी उमेश मुत्तुस्वामी गौड (वय 56) हा गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात हजर राहत नसल्याने दीर्घकाळापासून फरार होता.

आरोपी वारंवार न्यायालयात गैरहजर राहत असल्याने अंधेरी येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट (NBW) तसेच जाहिरनामा जारी केला होता. मात्र, आरोपी अनेक वर्षे पोलिसांना चकवा देत होता.

दरम्यान, 29 जुलै 2026 रोजी जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या समन्स वॉरंट पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत आरोपीच्या मोबाईल क्रमांकाची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कौशल्यपूर्ण आणि तांत्रिक तपास करून आरोपी डोंबिवली परिसरात वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळविली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी डोंबिवली परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध न्यायालयाने जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटची पडताळणी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

तपासात आरोपीने न्यायालयाने ठोठावलेला 2 हजार रुपयांचा दंड आणि 10 हजार रुपयांचा जामीन तसेच 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मुक्त करण्याचे आदेश असल्याची माहिती समोर आली. मात्र, आरोपी न्यायालयात हजर न राहिल्याने त्याच्याविरुद्ध वॉरंट आणि जाहिरनामा जारी करण्यात आला होता.

तब्बल 38 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध अंधेरी न्यायालयाने जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करण्यात जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या समन्स वॉरंट पथकाला यश आले आहे. आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग डॉ. अमित देशमुख, पोलीस उपआयुक्त पश्चिम परिमंडळ-3 दत्ता नलावडे तसेच सहायक पोलीस आयुक्त मेघवाडी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इकबाल शेख यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली समन्स वॉरंट पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन ही कारवाई यशस्वी केली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.