मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयाची किशोरी पेडणेकर यांची पाहणी; दर्जेदार आरोग्यसेवेसाठी आवश्यक सुविधांचा आढावा
मुलुंड (पश्चिम) येथील अग्रवाल रुग्णालयाला भेट देत माजी महापौर तथा विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी वैद्यकीय सुविधांची पाहणी केली. नागरिकांना वेळेत, दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सुविधांचा आढावा घेत महानगरपालिकेमार्फत पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
मुंबई ब्यूरो | अनिल सावरे
मुंबई, दि. १७ (प्रतिनिधी) : मुलुंड (पश्चिम) येथील अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना अधिक दर्जेदार, वेळेवर आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर तथा विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी रुग्णालयाला भेट देत विविध वैद्यकीय सुविधांची सविस्तर पाहणी केली. यावेळी प्रभाग क्रमांक ११४, भांडुप (पश्चिम)च्या नगरसेविका राजोल संजय पाटील उपस्थित होत्या.
पाहणीदरम्यान किशोरी पेडणेकर यांनी रुग्णालयातील विविध विभाग, उपचार व्यवस्था, आधुनिक वैद्यकीय उपकरणे, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपलब्धता तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा सखोल आढावा घेतला. रुग्णालय प्रशासनाशी संवाद साधत नागरिकांना अधिक चांगल्या आणि तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधांबाबत माहिती जाणून घेतली.
यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला कोणताही त्रास न होता वेळेत आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ देता कामा नये. आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जाईल."
नगरसेविका राजोल संजय पाटील यांनीही मुलुंड व भांडुप परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका स्पष्ट केली. स्थानिक नागरिकांना उपचारासाठी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी महानगरपालिका प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक उपाययोजना राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
रुग्णालय प्रशासनासोबत झालेल्या चर्चेत पर्यायी वैद्यकीय सुविधा, आधुनिक उपचार व्यवस्था आणि अधिक सक्षम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवून आरोग्य सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी पुढील काळातही सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या पाहणी दौऱ्यात कामगार नेते बाबा कदम, नगरसेवक सुरेश शिंदे, नगरसेविका दिपमाला बढे, रंजना नेवाळकर, ज्योती राजभोज, प्रियदर्शनी ठाकरे तसेच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0