कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम - अभिनेते राहुल सोलापूरकर

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने आयोजित कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सवास अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी भेट देत स्टॉलधारक शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. चार दिवसांत महोत्सवात तब्बल ३० लाखांची उलाढाल झाली.

Apr 26, 2026 - 04:13
 0  7
कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम - अभिनेते राहुल सोलापूरकर
कोल्हापूर मिलेट महोत्सव, राहुल सोलापूरकर, फळ महोत्सव कोल्हापूर, कृषि पणन मंडळ,

कोल्हापूर, दि. २५ : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मिलेट व फळ महोत्सवास प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी भेट देऊन महोत्सवातील सर्व स्टॉलधारक उत्पादकांशी संवाद साधला व त्यांना प्रोत्साहन दिले.

महोत्सवात मिलेटच्या वापरातून तयार करण्यात आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या आकर्षक रांगोळीचे त्यांनी विशेष कौतुक केले. या उपक्रमाला त्यांनी स्तुत्य उपक्रम असे संबोधत आयोजकांचे अभिनंदन केले.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी एसजीएम कॉलेज, कराड येथील फूड सायन्स विभाग प्रमुख डॉ. अहिल्या वाघमोडे यांनी ‘मिलेटची ओळख व मानवी शरीरास होणारे फायदे’ या विषयावर व्याख्यान दिले. तिसऱ्या दिवशी कृषी विज्ञान केंद्र, कोल्हापूर येथील डॉ. प्रतिभा ठोंबरे यांनी ‘मिलेट उपयुक्तता व मिलेट व्हॅल्यू ॲडिशन’ या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी मिलेट पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सोनल भोसले यांनी प्रथम, मयुरी रानमाळे यांनी द्वितीय तर श्रेया पोफळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. दीपाली देसाई यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला. विजेत्यांचा प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

गेल्या चार दिवसांत महोत्सवात तब्बल ३० लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती आयोजकांनी दिली. कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक विनायक कोकरे यांनीही महोत्सवाला भेट देत स्टॉलधारक शेतकऱ्यांशी चर्चा केली.

आज (रविवार) हा महोत्सवाचा शेवटचा दिवस असून सायंकाळी ५ वाजता डॉ. संदीप पाटील यांचे मिलेट विषयक व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कोल्हापूरकरांनी महोत्सवाला भेट देऊन मिलेट व फळांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0