शासनाच्या ऑनलाइन सेवा नागरिकांना विहित वेळेत द्या; अर्ज प्रलंबित ठेवू नका – राज्य आयुक्त सुधाकर तेलंग
कोल्हापूर महानगरपालिकेने शासनाच्या ऑनलाइन सेवांबाबत नागरिकांचे अर्ज विहित वेळेत निकाली काढावेत आणि कोणताही अर्ज प्रलंबित ठेवू नये, असे निर्देश राज्य सेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दिले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015 च्या अंमलबजावणीच्या आढावा बैठकीत त्यांनी ऑनलाइन सेवांमध्ये अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमतेवर भर दिला.
कोल्हापूर | प्रतिनिधी उमेश जाधव
प्रशासकीय कामकाजात अधिक गतिमानता आणणे, नागरिकांची कामे पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त पद्धतीने वेळेत पूर्ण करणे हा शासनाचा उद्देश असून, शासनाच्या ऑनलाइन सेवांबाबत नागरिकांचे अर्ज विहित वेळेत निकाली काढावेत आणि कोणताही अर्ज प्रलंबित ठेवू नये, असे स्पष्ट निर्देश राज्य सेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग (सेवानिवृत्त भाप्रसे) यांनी कोल्हापूर महानगरपालिकेला दिले.
कोल्हापूर महानगरपालिकेत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015 च्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त पारितोष कंकाळ, किरण कुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त राम काटकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाने नागरिकांना विविध सेवा घरबसल्या उपलब्ध व्हाव्यात आणि कार्यालयीन प्रक्रियेत पारदर्शकता यावी या उद्देशाने 67 शासकीय सेवा ऑनलाइन सुरू केल्या आहेत. या सेवांचा लाभ नागरिकांना वेळेत मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत सुधाकर तेलंग यांनी संबंधित विभागांनी प्रत्येक अर्जाची तत्परतेने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
ते म्हणाले की, केवळ सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देणे पुरेसे नाही, तर त्या सेवांची योग्य प्रकारे नोटिफिकेशन प्रक्रिया पूर्ण होणेही आवश्यक आहे. तसेच ऑनलाइन अर्जांमध्ये तांत्रिक किंवा कागदपत्रांच्या त्रुटी राहणार नाहीत, याची संबंधित अधिकारी आणि विभागांनी विशेष दक्षता घ्यावी.
नागरिकांच्या अनुभवाला अधिक महत्त्व देत त्यांनी ऑनलाइन सेवांबाबत नागरिकांचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी महानगरपालिकेत स्वतंत्र अभिप्राय कक्ष (Feedback Cell) सुरू करण्याची सूचना केली. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी वेळेत समजून त्यावर प्रभावी उपाययोजना करता येतील, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी सांगितले की, कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या एकूण 68 नागरिकाभिमुख सेवांची सुविधा उपलब्ध असून त्यापैकी 56 सेवा ऑनलाइन आणि 12 सेवा ऑफलाइन स्वरूपात कार्यरत आहेत. या सेवांद्वारे नागरिकांना विविध प्रमाणपत्रे, परवाने आणि नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
बैठकीच्या प्रारंभी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांनी शहरातील नागरिकांसाठी सेवा बोर्ड सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच महानगरपालिकेमार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध ऑनलाइन आणि ऑफलाइन सुविधांचे सादरीकरण पॉवर पॉइंट (PPT) द्वारे करण्यात आले.
बैठकीस उपसचिव अनुराधा खानविलकर, कक्ष अधिकारी रंजना गवारी, शिल्पा पुरोहित, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, निवास पोवार, अरुणकुमार गवळी, उपशहर रचनाकार एन. एस. पाटील, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, प्रशांत पंडत, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, यशपालसिंह रजपूत, परवाना अधीक्षक अशोक यादव, सहाय्यक अभियंता अमित दळवी, कनिष्ठ अभियंता अभिलाषा दळवी, पदमल पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
राज्य सेवा हक्क आयोगाने दिलेल्या या निर्देशांमुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या ऑनलाइन सेवांची गुणवत्ता, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेत अधिक सुधारणा होऊन नागरिकांना शासकीय सेवा अधिक वेगाने आणि सुलभपणे उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0