‘महालक्ष्मी सरस २०२६’ला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; एका दिवसात ६ कोटींची विक्रमी उलाढाल

बीकेसी येथे सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस २०२६’ प्रदर्शनाला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद मिळत असून एका दिवसात ६ कोटींची विक्रमी विक्री झाली आहे. आतापर्यंत ३२ कोटींची उलाढाल झाली असून प्रदर्शनाची मुदत १७ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे.

May 14, 2026 - 01:24
 0  9
‘महालक्ष्मी सरस २०२६’ला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; एका दिवसात ६ कोटींची विक्रमी उलाढाल
महालक्ष्मी सरस २०२६, उमेद अभियान, जयकुमार गोरे, महिला बचत गट, ग्रामीण

मुंबई, दि. १३ :

उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बीकेसी येथे २ मेपासून सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस २०२६’ प्रदर्शनाला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. ग्रामीण महिला उद्योजिकांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात ग्रामीण महाराष्ट्राची संस्कृती, हस्तकला, खाद्यपरंपरा आणि महिला सक्षमीकरणाचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे.

ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष पाठबळ लाभले आहे. त्यामुळे प्रदर्शनाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरूप प्राप्त झाले असून ग्रामीण महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत आहे.

प्रदर्शनात राज्यभरातील महिला बचत गटांनी तयार केलेले दागिने, साड्या, बांबू वस्तू, घरगुती सजावटीचे साहित्य, ग्रामीण कलाकुसरीचे नमुने तसेच सेंद्रिय गूळ, पापड, लोणची, मसाले, चटण्या आणि पुरणपोळ्यांसारखे पारंपरिक खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. काही पारंपरिक लोणच्यांना किलोमागे हजार रुपयांपर्यंत दर मिळाला असून अनेक स्टॉल्सवरील ६० टक्क्यांहून अधिक माल अल्पावधीत विकला गेला आहे.

९ मे रोजी एका दिवसात तब्बल ६ कोटी रुपयांची विक्री झाली. आतापर्यंत प्रदर्शनातून ३२ कोटी रुपयांची उलाढाल झाली असून यंदा ५० कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईकरांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता प्रदर्शनाची मुदत १७ मे २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

‘उमेद मॉल’ संकल्पनेद्वारे कायमस्वरूपी बाजारपेठ

महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी यासाठी ‘उमेद मार्ट’ या डिजिटल प्लॅटफॉर्मसोबतच ‘उमेद मॉल’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलचे काम सुरू असून पुढील एका वर्षात ही कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक मॉल किमान २० हजार चौरस फुटांचा असणार आहे.

प्रदर्शनातील विशेष सुविधा

प्रदर्शन परिसर पूर्णपणे वातानुकूलित करण्यात आला असून स्वतंत्र एसी फूड कोर्ट, डिजिटल थीम पार्क आणि होम डिलिव्हरी सुविधा प्रथमच उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांगांसाठी व्हीलचेअर सुविधा तसेच वांद्रे पूर्व आणि कुर्ला पश्चिम रेल्वे स्थानकांवरून मोफत बससेवाही उपलब्ध आहे. शनिवार आणि रविवारी १५ ते २० हजार नागरिक प्रदर्शनाला भेट देत आहेत.

उमेद अभियानाची यशस्वी वाटचाल

सन २०११ पासून सुरू असलेल्या उमेद अभियानांतर्गत राज्यातील ३४ जिल्हे, ३५१ तालुके आणि ३१ हजार ५७८ गावांमध्ये कार्य सुरू आहे. या अभियानात ६६ लाख ग्रामीण कुटुंबांचा सहभाग असून ६ लाख ७० हजार स्वयं सहायता गटांची स्थापना करण्यात आली आहे. बँकांमार्फत बचत गटांना ५० हजार १५० कोटी रुपयांहून अधिक कर्जवाटप करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेतील ५ लाख घरकुलांचे लोकार्पण लवकरच

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणावर घरकुलांचे काम सुरू असून मागील एका वर्षात ५ लाख ८ हजार २६७ घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत. या घरकुलांचे लोकार्पण केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार आहे.

“मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला त्यासाठी आभार. एक कोटी लखपती दीदी बनविण्याचे उद्दिष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून आम्ही त्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल करत आहोत,” असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.