महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात वाघजाई तर महिला गटात राजमाता जिजाऊ संघ विजेता
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२६’ मध्ये पुरुष गटात रत्नागिरीच्या वाघजाई संघाने तर महिला गटात पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने विजेतेपद पटकावले. समारोप सोहळ्यात महापौर रवि लांडगे यांनी क्रीडा संस्कृतीला चालना देणाऱ्या अशा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. ११ मे २०२६ :
“महापौर चषक ही केवळ स्पर्धा नसून राज्यातील नवोदित खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी आहे. पिंपरी चिंचवड शहर क्रीडा संस्कृतीला चालना देणारे शहर म्हणून ओळख निर्माण करत आहे आणि अशा स्पर्धांमधून भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील,” असा विश्वास महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२६’ च्या समारोप व पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी आमदार महेश लांडगे, विधानपरिषद सदस्य तथा माजी मंत्री सचिन अहिर, क्रीडा, कला, साहित्य आणि सांस्कृतिक सभापती कैलास कुटे, नगरसदस्या भीमाताई फुगे, नगरसदस्य शीतल उर्फ विजय शिंदे, सागर गवळी, दत्ता गव्हाणे, सचिन तापकीर, माजी नगरसदस्य विलास मेडिगिरी, पंडितराव गवळी, सहाय्यक कामगार आयुक्त अश्विनी साकोरे, उपायुक्त पंकज पाटील यांच्यासह क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेत पुरुष गटात रत्नागिरीच्या वाघजाई कबड्डी संघाने शानदार कामगिरी करत महापौर चषकावर आपले नाव कोरले, तर महिला गटात पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने विजेतेपद पटकावले.
पुरुष गटातील निकालात वाघजाई कबड्डी संघ, रत्नागिरी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. शिवमुद्रा संघ, कोल्हापूर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, तर बारामती स्पोर्ट क्लब, बारामती तृतीय आणि सतेज संघ, पुणे चतुर्थ क्रमांकावर राहिले.
महिला गटात राजमाता जिजाऊ संघ, पुणे यांनी प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले. शिवशक्ती संघ, मुंबई यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, तर बारामती स्पोर्ट क्लब, बारामती तृतीय आणि धर्मवीर कबड्डी संघ, नंदुरबार यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांमध्ये पुरुष गटात साहिल पाटील यांना “सर्वोत्कृष्ट खेळाडू” म्हणून बुलेट प्रदान करण्यात आली. तसेच अर्जुन तडस यांना पंचाहत्तर हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले. “सर्वोत्कृष्ट चढाई” पुरस्कार अजिंक्य पवार यांना चेतक गाडी देऊन प्रदान करण्यात आला, तर अजित चव्हाण यांना पन्नास हजार रुपये व चषक देण्यात आला. “सर्वोत्कृष्ट पकड” प्रकारात शुभम शिंदे यांना चेतक गाडी तर वैभव रबाडे यांना पन्नास हजार रुपये आणि चषक प्रदान करण्यात आला.
महिला गटात निकिता पडवळ यांना “सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू” म्हणून चेतक गाडी प्रदान करण्यात आली, तर मृणाली भुवड यांना पंचाहत्तर हजार रुपये आणि चषक देण्यात आला. “सर्वोत्कृष्ट चढाई” प्रकारात सोनाली शिंगटे यांना चेतक गाडी तर मनिषा बारटक्के यांना पन्नास हजार रुपये व चषक देण्यात आला. “सर्वोत्कृष्ट पकड” पुरस्कार ऋतुजा तिगडे यांना चेतक गाडी आणि हर्षदा सोनवणे यांना पन्नास हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव उज्ज्वल करणाऱ्या अर्जुन आणि छत्रपती पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर, छत्रपती पुरस्कार विजेते सूर्यकांत पाटील, संगीता सोनावणे, सायली क्रिपाळे, अमरदीप चांदुगुडे, माजी प्रो कबड्डी खेळाडू सुनील लांडे आणि माजी आंतरराष्ट्रीय खेाडू रामदास लांडगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातील नामांकित खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0