तंत्रज्ञानाच्या युगात मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपणे गरजेचे – हंसाजी योगेंद्र
मंत्रालयात आयोजित ‘योगरंग – योगा फॉर अ हेल्दी लाइफ’ सत्रात योग संस्थेच्या संचालिका हंसाजी योगेंद्र यांनी तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. योग हा केवळ व्यायाम नसून संतुलित जीवनशैलीचा आधार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई, दि. ६ : तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात नवीन कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असले तरी मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन योग संस्थेच्या संचालिका हंसाजी योगेंद्र यांनी केले. मंत्रालयात आयोजित ‘टेक वारी 2.0 – महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत ‘योगरंग – योगा फॉर अ हेल्दी लाइफ’ या विशेष सत्रात त्या बोलत होत्या.
हंसाजी योगेंद्र म्हणाल्या की, माहिती मिळवणे आणि ती प्रभावीपणे आत्मसात करणे यामध्ये फरक आहे. यासाठी मनाची एकाग्रता, स्थिरता आणि शरीराची सुदृढता आवश्यक असते. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत असताना मानसिक संतुलन राखणे गरजेचे आहे.
योगासाठी स्वतंत्र वेळ काढण्याची आवश्यकता नसून तो दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “काम महत्त्वाचे आहे, पण स्वतःला विसरून काम करू नका. स्वतःची जाणीव ठेवून काम करणे हीच खरी जीवनशैली आहे,” असा सल्लाही त्यांनी दिला.
मानसिक तणाव, राग आणि नकारात्मक विचारांचा शरीरावर गंभीर परिणाम होतो, असे सांगताना त्यांनी नमूद केले की, सुमारे ७० टक्के आजारांचे मूळ चुकीची जीवनशैली आणि मानसिक असंतुलन हे आहे. त्यामुळे आत्मजाणीव, आत्मस्नेह आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा स्वीकार करणे आवश्यक आहे.
“रिएक्शन” देण्याऐवजी “रिस्पॉन्स” देण्याची सवय अंगीकारावी, असे सांगताना त्यांनी काही क्षण थांबून श्वासावर लक्ष केंद्रित करून विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सल्ला दिला. तसेच ‘लेट गो’ची वृत्ती विकसित करून इतरांच्या वागण्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून तो मनोविज्ञानाशी संबंधित विषय आहे. योग्य विचारसरणी विकसित करून तणावमुक्त, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्यासाठी योगाचा अवलंब आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, योग संस्थेचे सहायक संचालक ऋषी योगेंद्र यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0