म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची सिद्धार्थनगर-गोरेगाव आणि एसव्हीपी नगर पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी; ३,७०० घरांच्या प्रकल्पांना गती

म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सिद्धार्थनगर-गोरेगाव गृहनिर्माण प्रकल्प आणि अंधेरीतील सरदार वल्लभभाई पटेल नगर समूह पुनर्विकास प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासह नागरिकांना आधुनिक, सुरक्षित आणि परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

May 28, 2026 - 01:34
 0  6
म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची सिद्धार्थनगर-गोरेगाव आणि एसव्हीपी नगर पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी; ३,७०० घरांच्या प्रकल्पांना गती
म्हाडा, संजीव जयस्वाल, सिद्धार्थनगर गोरेगाव प्रकल्प,

मुंबई ब्यूरो अनिल सावरे 

मुंबई, दि. २७ : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळांतर्गत सुरू असलेल्या सिद्धार्थनगर-गोरेगाव गृहनिर्माण प्रकल्पाच्या कामांची प्रगती आणि अंधेरी येथील सरदार वल्लभभाई पटेल (एसव्हीपी) नगर समूह पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी घेतला.

मुंबईमध्ये म्हाडामार्फत Construction and Development Agency (C&DA) प्रणालीअंतर्गत सुमारे ९२५ एकर क्षेत्रात ११ महत्त्वाकांक्षी पुनर्विकास प्रकल्प राबवले जात आहेत. त्यामध्ये अंधेरी पश्चिम येथील सरदार वल्लभभाई पटेल नगर समूह पुनर्विकास प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. सुरक्षित, आधुनिक आणि परवडणारी घरे उपलब्ध करून नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणे हे म्हाडाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.

गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर गृहनिर्माण प्रकल्पात विविध भूखंडांवर गृहनिर्माण कामे सुरू आहेत. R-1 भूखंडावर निम्न आणि मध्यम उत्पन्न गटासाठी ५०७ घरांचे बांधकाम सुरू आहे. R-3 भूखंडावर ३९१ घरे विकसित केली जात असून त्यातील B, C आणि D विंगचे काम पूर्ण झाले आहे. यापैकी ३०६ घरांचे वितरण २०१६ मध्ये सोडतीद्वारे करण्यात आले होते. A विंगमधील उर्वरित ८५ घरे २०२६ च्या सोडतीत समाविष्ट केली जाणार आहेत.

तसेच R-4 भूखंडावर ९१५ घरे आणि २० दुकाने, R-7/A-2 भूखंडावर ५७६ घरे, R-7/A-1 भूखंडावर १,१८१ घरे तर R-12A भूखंडावर विविध उत्पन्न गटांसाठी २३७ घरांचे नियोजन करण्यात आले आहे. R-13 भूखंडावर उच्च उत्पन्न गटासाठी २५० घरांचे काम सुरू आहे.

संपूर्ण सिद्धार्थनगर-गोरेगाव प्रकल्पात सुमारे ३,७०० घरांचे बांधकाम सुरू असून गोरेगावसारख्या महत्त्वाच्या परिसरात सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध होणार आहेत.

यावेळी जयस्वाल यांनी बांधकामांना गती देणे, आवश्यक परवानग्या तातडीने मिळवणे आणि प्रकल्पांमधील अडथळे दूर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

त्यानंतर त्यांनी अंधेरी पश्चिम येथील सरदार वल्लभभाई पटेल नगर (SVP नगर) वसाहतीची पाहणी केली. सुमारे ७३.८९ एकर क्षेत्रात विस्तारलेल्या या समूह पुनर्विकास प्रकल्पासाठी C&DA नियुक्ती प्रक्रियेअंतर्गत तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या आहेत.

जयस्वाल यांनी स्थानिक रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पुनर्विकासामुळे नागरिकांना अधिक प्रशस्त, आधुनिक आणि सुविधायुक्त घरे उपलब्ध होतील तसेच परिसराचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पाहणी दौऱ्यात मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुख्य अभियंता धीरजकुमार पंदिरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, सहमुख्य अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0