मृणालताई गोरे उड्डाणपूल, ओशिवरा प्रसूतिगृह व स्मशानभूमीची कामे जलद पूर्ण करा – उपमहापौर संजय घाडी
मुंबईतील मृणालताई गोरे उड्डाणपूल, ओशिवरा प्रसूतिगृह आणि ओशिवरा स्मशानभूमीच्या कामांची उपमहापौर संजय घाडी यांनी पाहणी करत कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
मुंबई : पश्चिम उपनगरातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी मृणालताई गोरे उड्डाणपूल, ओशिवरा प्रसूतिगृह आणि ओशिवरा स्मशानभूमीच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
गोरेगाव ते राम मंदिर मार्गावरील मृणालताई गोरे उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून सुमारे ९० ते ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुलावरील रस्त्याचे पुनर्पृष्ठीकरण, दिशादर्शक फलक, दिवाबत्ती व्यवस्था, गतिरोधक, रस्ते पट्टे तसेच कठड्यांचे रंगकाम युद्धपातळीवर सुरू आहे. परिसरातील नागरिकांना ध्वनीप्रदूषणाचा त्रास होऊ नये यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूंना ध्वनीरोधक उभारण्यात आले आहेत.
उपमहापौर संजय घाडी यांनी पुलाची लोड टेस्ट पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी उर्वरित सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाने प्रभावी नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी १५२ रुग्णशय्या क्षमतेच्या ओशिवरा प्रसूतिगृह प्रकल्पाचाही आढावा घेण्यात आला. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सज्ज असलेल्या या प्रकल्पात शस्त्रक्रिया विभाग, नवजात बालक अतिदक्षता विभाग (NICU), लहान मुलांसाठी MICU, डायलिसिस विभाग, सिटी स्कॅन सुविधा तसेच डॉक्टर आणि परिचारिकांसाठी निवासी व्यवस्था उभारण्यात येत आहे.
या प्रकल्पाचे बांधकाम निर्धारित मुदतीत आणि उच्च दर्जाचे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या. नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, ओशिवरा स्मशानभूमीतील काही प्रलंबित कामांचीदेखील पाहणी करण्यात आली. पुढील पंधरा दिवसांत सर्व छोटी-मोठी कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
या पाहणी दौऱ्यावेळी सहायक आयुक्त कुंदन वळवी, अनिरुद्ध कुलकर्णी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पांपटवार यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

