नाशिकमध्ये भोंदू बाबाकडून महिलेचे लैंगिक शोषण; अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नांमुळे गुन्हा दाखल
नाशिक जिल्ह्यात एका भोंदू बाबाकडून महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हस्तक्षेपानंतर आरोपीविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायदा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक ब्यूरो - (लासलगाव), दि. २२ : अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत एका भोंदू बाबाकडून महिलेचे लैंगिक शोषण केल्याची गंभीर घटना समोर आली असून, अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) यांच्या प्रयत्नांमुळे आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव (खडक) येथे वास्तव्यास असलेल्या महेशगिरी नावाच्या भोंदूने ‘दैवी शक्ती’ असल्याचा दावा करत एका तरुणीच्या कुटुंबाला फसवले. घरगुती अडचणी आणि मुलीच्या विवाहातील अडथळ्यांमुळे त्रस्त असलेल्या कुटुंबाने या भोंदूकडे मदत मागितली होती.
आरोपीने संबंधित महिलेला ‘बाधा झाली’ असल्याचे सांगत विविध तथाकथित धार्मिक विधी करून घेतले. त्यानंतर काही दिवसांनी त्याने महिलेच्या मोबाईलवर अश्लील संदेश पाठवण्यास सुरुवात केली. पुढे ‘दैवी विधी’च्या नावाखाली तिला एकांतात नेण्याची गरज असल्याचे सांगून नाशिक येथे बोलावले.
त्यानंतर आरोपीने महिलेची फसवणूक करून तिला नाशिक त्र्यंबक रोड परिसरातील एका लॉजवर नेले आणि भीती दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
पीडित महिलेने आपली आपबीती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितल्यानंतर प्रकरण पुढे आले. अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे यांनी तातडीने पोलिस प्रशासनाशी संपर्क साधला.
यानंतर नाशिक ग्रामीण पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलीस स्टेशन येथे आरोपी महेशगिरी काकडे याच्याविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायदा तसेच बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला.
अंनिसच्या कार्यकर्त्यांनी असा संशय व्यक्त केला आहे की, आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारे अनेक महिलांचे शोषण केले असण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणात आरोपीला मदत करणाऱ्या इतर व्यक्तींनाही सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या घटनेमुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणूक आणि शोषणाच्या प्रकारांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात असून नागरिकांनी अशा भोंदूंपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0