नाशिकमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर; मतदार पुनरीक्षणावर हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर गंभीर आरोप

नाशिकमध्ये काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानांतर्गत सुरू असलेल्या दहा दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मतदार पुनरीक्षण, सिंहस्थ कुंभमेळा, भ्रष्टाचार, रोजगार आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली.

Aug 26, 2026 - 02:49
 0  6
नाशिकमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर; मतदार पुनरीक्षणावर हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर गंभीर आरोप
हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रशिक्षण शिबिर, नाशिक काँग्रेस, संघटन सृजन अभियान, मतदार पुनरीक्षण, सिंहस्थ कुंभमेळा, नाशिक कुंभमेळा,

नाशिक ब्यूरो:

नाशिक, प्रतिनिधी : देशात सध्या कोणत्याही निवडणुका नसताना शासनाकडून मतदार पुनरीक्षणाची मोहीम राबविण्यात येत असून, पश्चिम बंगाल आणि बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही मतदारांची नावे वगळण्याचा भाजपचा हेतू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत नाशिकमध्ये सुरू असलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या दहा दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

सपकाळ यांनी आरोप करताना सांगितले की, किती मतदारांची नावे गहाळ करायची याची रणनीती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात ठरवली जात असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. मतदार यादीच्या पुनरीक्षणाच्या प्रक्रियेबाबत काँग्रेस पक्ष सजग असून, या प्रक्रियेत पारदर्शकता आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांवरही टीका

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी बोगस ऑर्डर काढून निधीचा गैरवापर केला जात असल्याचा दावा त्यांनी केला.

“कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारातील अवघा एक टक्का निधी शिक्षणासाठी दिला तरी राज्यातील हजारो शाळा वाचू शकतील,” असा दावा करत त्यांनी कुंभमेळ्याच्या कामांमध्ये पारदर्शकता आणि निधीच्या वापराबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली.

मंत्री गिरीश महाजन यांच्या नातेवाईकांनी कुंभमेळ्याच्या कामांमध्ये केलेल्या कथित भ्रष्टाचाराचे बक्षीस म्हणूनच त्यांना पालकमंत्रीपद देण्यात आल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. महाजन यांच्या कुंभमेळा मंत्रिपदाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवरही टीका केली.

मोदी सरकारच्या धोरणांवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर टीका करताना सपकाळ यांनी वर्षाला दोन कोटी रोजगार, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, १०० स्मार्ट सिटी आणि महिला सुरक्षेसह विविध आश्वासनांचा उल्लेख केला. ही आश्वासने पूर्ण झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

देशाची सर्व बाजूंनी अधोगती होत असल्याचा दावा करत, सरकारने आपल्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड जनतेसमोर मांडावे, अशी मागणीही त्यांनी केली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भातही सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. “डोनाल्ड ट्रम्प यांना मोदी का घाबरत आहेत?” असा सवाल करत त्यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित केले.

पुलवामा हत्याकांडातील आरोपी कोण होते, हे आधी स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

नीट पेपरफुटीच्या मूळ समस्येवर उपचार करा

नीट परीक्षेच्या प्रश्नावर बोलताना कोचिंग क्लासेसवर निर्बंध घालण्याऐवजी पेपरफुटीच्या मूळ समस्येवर उपचार करण्याची गरज असल्याचे सपकाळ म्हणाले.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावर झालेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी राहुल गांधी यांचा युवकांशी संवाद भारत जोडो यात्रेपासून सातत्याने सुरू असल्याचे सांगितले.

प्रशिक्षण शिबिरातून काँग्रेसचा ‘रोडमॅप’

काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानांतर्गत सुरू असलेल्या दहा दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिरात काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

प्रशिक्षणाच्या नवव्या दिवशी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल मार्गदर्शन करणार असून, शिबिराच्या समारोपावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सपकाळ यांनी दिली.

काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या प्रशिक्षण शिबिरात चिंतन आणि मंथन सुरू असून, या मंथनातून देशाला पुढे नेण्यासाठी रोडमॅप तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच रचनात्मक कार्यासाठी या प्रशिक्षणातून मार्गदर्शन केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठी भाषेवर राजकारण नको

परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकविण्याच्या शासनाच्या धोरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर सपकाळ यांनी मराठी भाषेची अस्मिता जपली पाहिजे, मात्र भाषेच्या मुद्द्यावर राजकारण करणे चुकीचे असल्याचे सांगितले.

परप्रांतीयांनी मराठी बोलली पाहिजे, मात्र ही बाब सामाजिक संवादातून आणि सलोख्याच्या वातावरणातून साध्य केली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

प्रशिक्षणातून संघटन बळकटीचा प्रयत्न

काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानांतर्गत आयोजित या प्रशिक्षण शिबिराचा उद्देश पक्षाच्या संघटनात्मक कार्याला बळकटी देणे आणि तळागाळातील जनतेशी अधिक प्रभावीपणे जोडले जाणे हा असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.

पत्रकार परिषदेला काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव, महाराष्ट्राच्या प्रभारी रेहानाचीष्टी, खासदार डॉ. शोभा बच्छाव, प्रशिक्षण विभागाचे महाराष्ट्र प्रमुख आशुतोष शिर्के, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.