निगडीत आमदार चषक जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात
पिंपरीतील निगडी येथे आमदार चषक जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. महापौर रवि लांडगे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाचे महत्त्व अधोरेखित केले.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. २४ एप्रिल २०२६ : निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात ग्रामीण खेळाडू विकास प्रकल्प व आमदार उमा खापरे यांच्या वतीने आयोजित आमदार चषक जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा २०२६ ला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले की, शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच खेळालाही महत्त्व दिले पाहिजे. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी क्रीडा अत्यंत आवश्यक आहे. खेळामुळे नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास विकसित होतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने नियमितपणे विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे.
ते पुढे म्हणाले की, शैक्षणिक प्रगतीसोबत शारीरिक तंदुरुस्ती, संघभावना आणि शिस्त यासाठी खेळात सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे. अशा स्पर्धांमधून ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळते. भविष्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त ठरतात.
यावेळी विधानपरिषद सदस्या आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, महापालिकेच्या कला, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, नगरसदस्य अमित गावडे, ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. मनोज देवळेकर, जयदीप खापरे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
उद्घाटन कार्यक्रमावेळी खेळाडू व प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना आपली क्षमता दाखविण्याची संधी उपलब्ध झाली असून युवकांमध्ये क्रीडाविषयी आकर्षण वाढणार असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0