ओशिवरा पोलिसांची मोठी कारवाई : 22 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर अटक
मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात 2004 साली दाखल झालेल्या पिटा अॅक्ट अंतर्गत गुन्ह्यातील 22 वर्षांपासून फरार असलेला आरोपी राजेंद्र शिवराम शिंदे याला पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे विलेपार्ले परिसरातून अटक केली. आरोपीविरुद्ध स्थायी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई : ओशिवरा पोलीस ठाण्यात सन 2004 मध्ये दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यातील तब्बल 22 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. राजेंद्र शिवराम शिंदे (वय 49) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला 3 जून 2026 रोजी ताब्यात घेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, ओशिवरा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 1201/2004 अंतर्गत पिटा अॅक्टच्या कलम 3, 4, 5 आणि 7(1)(C) अन्वये दाखल गुन्ह्यात राजेंद्र शिंदे हा आरोपी होता. आरोपी दीर्घकाळ फरार असल्याने मा. माझगाव सत्र न्यायालय, मुंबई यांनी त्याच्याविरुद्ध स्थायी अजामीनपात्र अटक वॉरंट (Standing Non-Bailable Warrant) जारी केले होते.
पोलिसांनी आरोपीच्या नोंद असलेल्या पत्त्यावर चौकशी केली असता संबंधित झोपडपट्टी परिसर सन 2012-13 मध्ये पुनर्विकासासाठी हटविण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे आरोपीचा कोणताही ठावठिकाणा लागत नव्हता.
दरम्यान, गुप्त माहितीदारांकडून आरोपीने सन 2005 मध्ये आपली खोली विकून अन्यत्र वास्तव्यास गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर निगराणी पथकाने विविध माध्यमांतून तसेच खबऱ्यांच्या मदतीने माहिती संकलित केली. तपासादरम्यान आरोपी विलेपार्ले परिसरातील एका नवीन पत्त्यावर राहत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना प्राप्त झाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित परिसरात गोपनीय पाळत ठेवली. 3 जून 2026 रोजी निगराणी दरम्यान संशयित व्यक्ती आढळून आली. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव राजेंद्र शिवराम शिंदे असल्याचे सांगितले. पुढील पडताळणीत तोच 22 वर्षांपासून फरार असलेला आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला तत्काळ अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीला त्याच दिवशी मा. माझगाव न्यायालय, मुंबई यांच्या समक्ष हजर करण्यात आले.
या यशस्वी कारवाईत API तुषार बाविस्कर, ASI सुनील साळुंखे, HC महेश साळोखे आणि PC महेंद्र भोये यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0