जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न; १७१ उमेदवारांची निवड

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कोल्हापुरात आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात १९ उद्योजकांनी सहभाग घेत ४६८ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली. ३०१ उमेदवारांपैकी १७१ जणांची प्राथमिक व अंतिम निवड करण्यात आली.

Jul 18, 2026 - 21:31
 0  8
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न; १७१ उमेदवारांची निवड
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, जागतिक युवा कौशल्य दिन,

कोल्हापूर | प्रतिनिधी : उमेश जाधव 

जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात १९ उद्योजकांनी ४६८ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली असून ३०१ उमेदवार उपस्थित राहिले. त्यापैकी एकूण १७१ उमेदवारांची प्राथमिक व अंतिम निवड करण्यात आली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत झालेल्या या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. खासदार धनंजय महाडिक अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार अमल महाडिक, विजय जाधव, रोजगार मेळावा समितीचे अध्यक्ष तथा समन्वयक संजय पेंडसे, राजवर्धन जगदाळे, भरत सोमैय्या, हरिश्चंद्र धोत्रे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी युवराज पाटील, आयटीआयचे प्राचार्य महेश आवटे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रास्ताविकात सहायक आयुक्त जमीर करीम यांनी रोजगार मेळाव्याचे महत्त्व स्पष्ट करत स्वयंरोजगाराच्या विविध संधी तसेच इंडिया स्किल्स स्पर्धा २०२६-२७ विषयी माहिती दिली. प्राचार्य महेश आवटे यांनी आयटीआयमध्ये उपलब्ध असलेल्या ३१ विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला.

रोजगार मेळावा समितीचे अध्यक्ष संजय पेंडसे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात उपलब्ध असलेल्या हजारो रोजगार संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. आमदार अमल महाडिक यांनी तरुणांनी स्थानिक रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा आणि भविष्यात आणखी व्यापक स्वरूपात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येतील, असे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात खासदार धनंजय महाडिक यांनी बदलत्या रोजगार बाजारपेठेत कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. शॉर्ट टर्म कौशल्य अभ्यासक्रमांमुळे देश-विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे सांगत, तरुणांनी रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे बनावे, असे आवाहन त्यांनी केले.

मेळाव्यात १९ उद्योजकांनी ४६८ रिक्त पदे अधिसूचित केली होती. या मेळाव्यास ३०१ उमेदवार उपस्थित राहिले. त्यापैकी २२१ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. १४१ उमेदवारांची प्राथमिक, तर ३० उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. तसेच स्वयंरोजगाराच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी विविध महामंडळांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी आयटीआयचे निदेशक ए. पी. कांबळे यांनी उपस्थित मान्यवर, उद्योजक आणि उमेदवारांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0