पिंपरी-चिंचवडमध्ये जॉगर्स पार्क परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई; १५०० चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाने प्रभाग क्रमांक ११ मधील जॉगर्स पार्क परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत सुमारे १५०० चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त केले. सार्वजनिक जागा मोकळ्या ठेवण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली.

May 22, 2026 - 01:08
 0  4
पिंपरी-चिंचवडमध्ये जॉगर्स पार्क परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई; १५०० चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अतिक्रमण कारवाई, जॉगर्स पार्क

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी | दि. २० मे २०२६

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक ११ मधील जॉगर्स पार्क उद्यान परिसरात अनधिकृत बांधकामांवर मोठी निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे १५०० चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले.

शहरातील सार्वजनिक जागा, उद्याने आणि नागरिकांसाठी राखीव असलेल्या मोकळ्या जागा अतिक्रमणमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली.

महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

कारवाईदरम्यान उप आयुक्त अतुल पाटील, प्रशासन अधिकारी महादेव बोरे, बांधकाम परवानगी विभागाचे उप अभियंता किरण सगर, कनिष्ठ अभियंता प्रताप मोरे तसेच उद्यान स्थापत्य आणि क्रीडा विभागाचे कनिष्ठ अभियंता वैभव विटकरे उपस्थित होते.

तसेच अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीट निरीक्षक) साक्षी जांभुळकर, निकिता भोईटे, विकास वारभुवन आणि रूपक शिनगारे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

या मोहिमेसाठी फ, अ आणि क क्षेत्रीय कार्यालयांमधील एकूण ५७ महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. याशिवाय १७ अतिक्रमण पोलीस, ६ जेसीबी मशीन, ८ मजूर आणि ३ वाहन चालक यांच्या सहाय्याने कारवाई पार पडली.

"अनधिकृत बांधकामांबाबत तडजोड नाही" – आयुक्त

महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, शहरातील सार्वजनिक जागा, उद्याने आणि नागरिकांसाठी राखीव मोकळी मैदाने अतिक्रमणमुक्त ठेवणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे.

"अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा कारवाया यापुढेही सातत्याने आणि अधिक प्रभावीपणे राबविण्यात येतील," असे त्यांनी स्पष्ट केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0