पावसाळ्यापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिका सतर्क; आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजनावर आयुक्तांचा भर
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नालेसफाई, पूरप्रवण भागांचे नियोजन, धोकादायक इमारतींची पाहणी आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे सभागृहात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व विभागांनी आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवून आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. शहरातील पाणी साचणाऱ्या ठिकाणांची ओळख करून कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात तसेच नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
पूरप्रवण भागातील नागरिकांच्या स्थलांतराचे पूर्वनियोजन करण्याबरोबरच शाळा आणि इतर निवारा केंद्रांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध ठेवण्यावर भर देण्यात आला. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये अखंडित वीजपुरवठा, अतिरिक्त बेड्सची उपलब्धता आणि आरोग्य विभागामार्फत नियमित साफसफाई, निर्जंतुकीकरण व धुरीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
धोकादायक इमारतींची पाहणी करून संबंधितांना नोटिसा देणे, अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्ज हटविणे तसेच नदीपात्राजवळील अतिक्रमणे दूर करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले. पावसाळ्यात तात्काळ मदत मिळावी यासाठी ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ कार्यरत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
याशिवाय, शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा तपासणे, नादुरुस्त कॅमेरे दुरुस्त करणे आणि मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्षातून सतत देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीदरम्यान क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या ‘अतिक्रमणमुक्त फुटपाथ’ मोहिमेचाही आढावा घेण्यात आला. पादचारी मार्ग सुरक्षित आणि मोकळे ठेवण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

