पिंपरी-चिंचवडसाठी हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट व ई-आरटीएस प्रकल्पाला गती; १७ किमीचा प्रायोगिक मार्ग प्रस्तावित
पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी एचसीएमटीआर आणि ई-आरटीएस प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. पहिल्या टप्प्यात १७ किमीचा प्रायोगिक मार्ग विकसित करण्याचे नियोजन आहे.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. २८ जुलै : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील वाढत्या वाहतूक गरजा लक्षात घेऊन एचसीएमटीआर (हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट) आणि ई-आरटीएस (इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम) या महत्त्वाकांक्षी सार्वजनिक वाहतूक प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने या प्रकल्पासाठी आवश्यक प्रशासकीय, तांत्रिक आणि नियोजनासंदर्भातील कार्यवाही तातडीने सुरू करून प्रायोगिक प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे शहरीकरण आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील वाढता ताण लक्षात घेऊन भविष्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि प्रवाशाभिमुख करण्याच्या दृष्टीने एचसीएमटीआर आणि वर्तुळाकार मार्ग विकास प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २७ जुलै २०२६ रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक झाली.
या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, अपर मुख्य सचिव के. एच. गोविंदराज, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त अभिजित चौधरी, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आदी उपस्थित होते.
मेट्रोप्रमाणे वेगवान; पूर्णतः इलेक्ट्रिक प्रणाली
बैठकीदरम्यान पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ई-आरटीएस या अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची संकल्पना संगणकीय सादरीकरणाद्वारे मांडली.
ई-आरटीएस ही प्रणाली मेट्रोप्रमाणेच वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी असणार असून, ती रबर टायरवर धावणाऱ्या पूर्णतः इलेक्ट्रिक वाहनांवर आधारित असेल. या प्रणालीतील एका वाहनातून सुमारे २४० हून अधिक प्रवासी प्रवास करू शकतील, अशी क्षमता प्रस्तावित करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात १७ किलोमीटरचा प्रायोगिक मार्ग
या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणून सुमारे १७ किलोमीटर लांबीचा प्रायोगिक मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला. या मार्गात गोडाऊन चौक – कुदळवाडी चौक – ऑटो क्लस्टर – काळेवाडी फाटा – जगताप डेअरी चौक – वाकड या प्रमुख भागांचा समावेश करण्यात आला आहे.
महामेट्रोच्या सहकार्याने हा प्रायोगिक प्रकल्प सुमारे एक ते दीड वर्षांच्या कालावधीत कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर एचसीएमटीआर तसेच शहरातील सर्व बीआरटी मार्गांवर ई-आरटीएस प्रणालीचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात येणार आहे.
मेट्रो, रेल्वे आणि इतर वाहतूक व्यवस्थांशी जोडणी
या प्रकल्पाअंतर्गत शहरातील सर्व मेट्रो स्थानके, रेल्वे स्थानके आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांशी प्रभावी व सुलभ जोडणी निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे नागरिकांना अखंड, जलद, सुरक्षित आणि प्रवाशाभिमुख प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होणे, वायू प्रदूषणात घट होणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढणे आणि नागरिकांना पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
सादरीकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संकल्पनेचे स्वागत करून प्रकल्पास मान्यता दर्शविली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने ई-आरटीएस प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही तातडीने सुरू करावी. तसेच प्रायोगिक प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित कार्यवाही गतीने करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0