शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये संयुक्त कारवाई; ६९ वाहनांवर दंड, ₹३.०८ लाखांचा दंड वसूल

पिंपरी-चिंचवडमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलीस आणि आरटीओने संयुक्त विशेष मोहीम राबवून १८१ वाहनांची तपासणी केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६९ वाहनांवर कारवाई करत ₹३.०८ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अशा मोहिमा सातत्याने सुरू ठेवण्याचा प्रशासनाचा निर्धार.

Jul 22, 2026 - 02:29
 0  9
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये संयुक्त कारवाई; ६९ वाहनांवर दंड, ₹३.०८ लाखांचा दंड वसूल
पिंपरी चिंचवड, शालेय वाहतूक, विद्यार्थी सुरक्षा, वाहतूक पोलीस, आरटीओ, संयुक्त कारवाई, शालेय वाहन तपासणी, मोटार वाहन कायदा,

पुणे प्रतिनिधी. | रोहन सोनाळे 

पिंपरी-चिंचवड : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) सहकार्याने विशेष संयुक्त तपासणी मोहीम राबवत नियमभंग करणाऱ्या वाहनांवर मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत १८१ शालेय वाहनांची तपासणी करण्यात आली असून ६९ वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करून ₹३ लाख ७ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

प्रशासनाकडे काही शालेय वाहने विद्यार्थ्यांची क्षमतेपेक्षा अधिक व धोकादायक पद्धतीने वाहतूक करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वाहतूक शाखा आणि आरटीओ यांनी संयुक्त विशेष मोहीम हाती घेतली. त्यानुसार २९ जून, ३० जून, २ जुलै आणि २० जुलै २०२६ रोजी पिंपरी, वाकड, सांगवी, महाळुंगे, चिंचोली, तळवडे आणि हिंजवडी परिसरात तपासणी करण्यात आली. 

तपासणीदरम्यान शालेय वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसणे तसेच सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे. 

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड आणि पोलीस उपआयुक्त (वाहतूक) विकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संयुक्त पथकाने केली. 

प्रशासनाने पालक, शाळा व्यवस्थापन आणि वाहनचालकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, भविष्यातही अशा विशेष संयुक्त तपासणी मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0