पीएम सूर्यघर योजना कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावीपणे राबवणार – मंत्री हसन मुश्रीफ
केंद्रीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम सूर्यघर योजनेची कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत सौर ऊर्जा, पाणंद रस्ते आणि पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला.
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पीएम सूर्यघर योजनेची कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करून नागरिकांना शून्य वीज बिलाचा दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आयोजित बैठकीत कागल तालुक्यातील पाणंद रस्ते, जयसिंगराव तलाव पाणीपुरवठा योजना, महावितरण तसेच इतर विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
हसन मुश्रीफ म्हणाले की, पीएम सूर्यघर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत अल्प व्याजदरात घरगुती सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी इच्छुक नागरिकांना कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासोबतच वाढत्या महागाईच्या काळात नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, कागल तालुक्यातील ८६ गावांमध्ये किमान एक किलोमीटरपर्यंतचे पाणंद रस्ते लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांना प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. तसेच कागल नगर परिषदेच्या मालकीच्या जयसिंगराव तलावातील पाण्याची पातळी कायमस्वरूपी पूर्ण क्षमतेने राखण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मंत्रालयात लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीदरम्यान कागल परिसरातील पर्यटन विकासावरही चर्चा झाली. ‘मिनी गोवा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील कारंजे, धबधबे आणि लाईट शो पाहण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन यांनी लवकरच कागल दौरा करावा, असे निमंत्रणही मंत्री मुश्रीफ यांनी दिले.
या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, तहसीलदार अमरदीप वाकडे, नगरपालिका मुख्याधिकारी अजित पाटणकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता एम. एस. मिसाळ, प्रवीण काळभोर, मनोज फराकटे, युवराज पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0