‘शबरी नॅचरल्स’चा डंका दिल्लीपर्यंत; केंद्रीय संचालक डॉ. वर्नाली डेका यांच्याकडून कौतुक

नाशिक दौऱ्यादरम्यान केंद्रीय जनजाती मंत्रालयाच्या संचालक डॉ. वर्नाली डेका यांनी ‘शबरी नॅचरल्स’ आणि शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या कार्याचे कौतुक केले. आदिवासी बांधवांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांमुळे जीवनमान उंचावत असल्याचे त्यांनी सांगितले.

May 10, 2026 - 01:02
 0  3
‘शबरी नॅचरल्स’चा डंका दिल्लीपर्यंत; केंद्रीय संचालक डॉ. वर्नाली डेका यांच्याकडून कौतुक

नाशिक ब्यूरो 

नाशिक : “आदिवासी बांधवांच्या समृद्ध संस्कृतीला आणि त्यांच्या अपार कष्टाला ‘शबरी नॅचरल्स’ या ब्रँडने दिलेली जागतिक ओळख खरोखरच कौतुकास्पद आहे,” अशा शब्दांत केंद्रीय जनजाती मंत्रालयाच्या संचालक डॉ. वर्नाली डेका यांनी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या कार्याचे कौतुक केले. नाशिक जिल्ह्याच्या विशेष क्षेत्रभेटीदरम्यान त्या बोलत होत्या.

क्षेत्रभेटीनंतर त्यांनी नाशिकस्थित शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ कार्यालयाला भेट दिली. यावेळी आदिवासी विकास आयुक्त तथा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड उपस्थित होत्या. तसेच धरती आबा जनजातीय अभियानाचे सल्लागार सुर्यांश निगम, महामंडळाच्या महाव्यवस्थापक जयरेखा निकुंभ, व्यवस्थापक राजेश पवार तसेच विविध शेतकरी उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आदिवासी संस्कृतीने भारावल्या डॉ. डेका

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दलपतपूर येथे डॉ. डेका यांच्या स्वागतासाठी पारंपरिक आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. स्थानिक आदिवासी बांधवांनी डफली आणि तारपा यांसारखी पारंपरिक वाद्ये वाजवत त्यांचे स्वागत केले, तर आदिवासी महिलांनी पारंपरिक नृत्य सादर केले. या स्वागत सोहळ्याने डॉ. डेका भारावून गेल्या आणि त्यांनी स्थानिक कलाकारांच्या कलेचे कौतुक केले.

काजू प्रक्रिया उद्योगाला भेट

क्षेत्रभेटीदरम्यान डॉ. डेका यांनी दलपतपूर येथील दावलेश्वर शेतकरी उत्पादक संस्थेच्या काजू प्रक्रिया उद्योगाला भेट दिली. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या कर्ज सहाय्यातून उभा राहिलेला हा प्रकल्प आदिवासींच्या आर्थिक सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.

कच्चा काजू तोडण्यापासून ते ‘शबरी नॅचरल्स’च्या आकर्षक पॅकेजिंगसह ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास त्यांनी जाणून घेतला. यावेळी त्यांनी लाभार्थी आदिवासी महिला आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ आणि आत्मविश्वास पाहून समाधान व्यक्त केले.

“जेव्हा एखादी संस्था पारदर्शकतेने आणि तळमळीने काम करते, तेव्हा त्याचे सकारात्मक परिणाम थेट समाजमनावर उमटतात,” असे डॉ. डेका यांनी यावेळी सांगितले.

केंद्र सरकारकडून सहकार्याचे आश्वासन

‘शबरी नॅचरल्स’ आणि शबरी महामंडळ हे महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांसाठी प्रगतीचे भक्कम आधारस्तंभ बनले असल्याचे मत डॉ. डेका यांनी व्यक्त केले. या यशस्वी मॉडेलची दखल घेऊन केंद्रीय जनजाती मंत्रालय आगामी काळात या प्रकल्पांना अधिक गती देण्यासाठी आणि नवीन तांत्रिक व आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0