SIR : केवळ नोंद नव्हे, आपल्या घटनात्मक अधिकाराचा आधार; विशेष मतदार यादी पुनरीक्षणात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा

महाराष्ट्रात ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR) मोहीम सुरू असून, प्रत्येक पात्र नागरिकाची मतदार यादीतील नोंद अचूक व अद्ययावत ठेवण्यासाठी नागरिकांनी बूथ लेव्हल अधिकाऱ्यांना (BLO) आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Jul 9, 2026 - 20:01
 0  6
SIR : केवळ नोंद नव्हे, आपल्या घटनात्मक अधिकाराचा आधार; विशेष मतदार यादी पुनरीक्षणात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा
SIR, Special Intensive Revision, विशेष सखोल मतदार यादी

कोल्हापूर | प्रतिनिधी : उमेश जाधव 

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) मोहिमेंतर्गत महाराष्ट्रात ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश प्रत्येक पात्र नागरिकाची मतदार यादीतील नोंद अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह ठेवणे हा असून, ही केवळ नोंदणी प्रक्रिया नसून प्रत्येक नागरिकाच्या घटनात्मक मतदानाच्या अधिकाराचा भक्कम आधार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या मोहिमेदरम्यान बूथ लेव्हल अधिकारी (BLO) प्रत्येक घराला भेट देत असून, नागरिकांनी त्यांना आवश्यक माहिती व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बीएलओ घरभेटीपूर्वी नागरिकांनी भारत निवडणूक आयोगाच्या ईसीआय पोर्टल, मोबाईल ॲप किंवा अधिकृत संकेतस्थळावरील "मागील SIR मध्ये नाव शोधा" या सुविधेचा वापर करून स्वतःची अथवा कुटुंबातील सदस्यांची २००२ मधील मतदार यादीतील माहिती तपासून ठेवावी.

जर संबंधित मतदाराचे २००२ मधील मतदार यादीशी मॅपिंग झालेले असेल, तर बीएलओ यांच्या गणना प्रपत्रात ती माहिती आधीच उपलब्ध असते. अशा वेळी नागरिकांनी माहितीची खात्री करून नाव, मोबाईल क्रमांक आणि इच्छेनुसार आधार क्रमांक नमूद करून प्रपत्रावर स्वाक्षरी करावी. अशा प्रकरणांमध्ये साधारणतः अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नसते. मात्र, आवश्यक असल्यास निवडणूक नोंदणी अधिकारी अधिक माहिती किंवा कागदपत्रे मागवू शकतात.

ज्या मतदारांचे २००२ मधील मतदार यादीशी मॅपिंग झालेले नाही, पण त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबाला त्या काळातील मतदार नोंद अथवा वास्तव्याची माहिती उपलब्ध आहे, त्यांनी ती माहिती बीएलओ यांना द्यावी. बीएलओ त्यांच्या अधिकृत ॲपच्या माध्यमातून माहितीची पडताळणी करून गणना प्रपत्र पूर्ण करतात.

तर काही नागरिकांकडे २००२ मधील मतदार यादीची माहिती उपलब्ध नसल्यासही त्यांना या प्रक्रियेपासून वंचित ठेवले जाणार नाही. बीएलओ संबंधित नागरिकाकडून आवश्यक माहिती व स्वाक्षरी घेऊन गणना प्रपत्र स्वीकारतील. त्यानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास संबंधित मतदाराला नोटीस देण्यात येऊ शकते. अशावेळी भारत निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व अथवा अन्य आवश्यक पात्रतेचा पुरावा सादर करावा लागू शकतो.

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, पावसाळा आणि विविध भौगोलिक अडचणींमध्येही बीएलओ घरोघरी जाऊन अत्यंत महत्त्वाचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांना अचूक माहिती देणे, गणना प्रपत्र काळजीपूर्वक तपासणे आणि वेळेत स्वाक्षरी करून प्रक्रिया पूर्ण करणे ही प्रत्येक नागरिकाची लोकशाहीप्रती असलेली जबाबदारी आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह बनेल तसेच प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा घटनात्मक अधिकार अधिक सुरक्षित राहील.

– सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.