महाराष्ट्राच्या पशुवैभवाला राष्ट्रीय मान्यता; ‘उमरडा’ गोवंश आणि ‘माडग्याळ’ मेंढीला स्वतंत्र ब्रीडचा दर्जा
महाराष्ट्रातील उमरडा गाईला स्वतंत्र देशी गोवंश आणि माडग्याळ मेंढीला स्वतंत्र अधिकृत प्रजाती म्हणून राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे पशुधन संवर्धन, आनुवंशिक सुधारणा आणि पशुपालकांच्या उत्पन्नवाढीला चालना मिळणार आहे.
प्रतिनिधी: नरेश शिंदे
मुंबई, दि. २० : महाराष्ट्राच्या पारंपरिक पशुधन संपदेला राष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान मिळाला आहे. राज्यातील प्रसिद्ध ‘उमरडा’ गोवंशाला स्वतंत्र देशी गोवंश, तर ‘माडग्याळ’ मेंढीला स्वतंत्र व अधिकृत प्रजाती (ब्रीड) म्हणून राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. या दुहेरी मान्यतेमुळे महाराष्ट्रातील या स्थानिक पशुधनाचे जतन, संवर्धन, शास्त्रीय पद्धतीने प्रजनन आणि आनुवंशिक सुधारणा कार्यक्रमांना मोठी चालना मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्यूरो, करनाल (हरियाणा) यांच्याकडे सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्यूरोचे संचालक डॉ. एन. एच. मोहन यांनी याबाबत अधिकृत पत्र जारी केले आहे.
७ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या ‘आयसीएआर ब्रीड रजिस्ट्रेशन कमिटी’च्या १४ व्या बैठकीत या दोन्ही प्रजातींच्या मान्यतेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
पारंपरिक पशुधनाच्या संवर्धनाला संस्थात्मक बळ
पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले. महाराष्ट्राच्या मातीत विकसित झालेल्या उमरडा गाईला स्वतंत्र देशी गोवंश आणि माडग्याळ मेंढीला स्वतंत्र अधिकृत प्रजाती म्हणून मिळालेली राष्ट्रीय मान्यता ही राज्यातील पशुपालकांसाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
या मान्यतेमुळे पारंपरिक पशुधनाच्या संवर्धनाला संस्थात्मक आणि शास्त्रीय बळ मिळणार असून, भविष्यात पशुपालकांचे उत्पन्न वाढविण्यासाठीही त्याचा उपयोग होईल, असे मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.
स्थानिक गोवंश आणि मेंढी प्रजातींचे जतन करण्यासोबतच त्यांची उत्पादकता व आनुवंशिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल. महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यपूर्ण पशुधनाची देशाच्या पशुधन क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.
शास्त्रीय संवर्धनासाठी व्यापक संधी
पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. यांनी सांगितले की, उमरडा गोवंश आणि माडग्याळ मेंढीला स्वतंत्र अधिकृत ब्रीड म्हणून मिळालेली राष्ट्रीय मान्यता ही महाराष्ट्राच्या पशुधन संपदेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची उपलब्धी आहे.
या दोन्ही स्थानिक प्रजातींची वैशिष्ट्ये, आनुवंशिक क्षमता आणि स्थानिक हवामान व परिस्थितीशी असलेली अनुकूलता यांचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन करण्यासाठी आता अधिक व्यापक संधी उपलब्ध झाल्या आहेत.
पशुपालक, संशोधक, विद्यापीठे आणि संबंधित संस्थांच्या समन्वयातून या प्रजातींचे जतन, संवर्धन आणि आनुवंशिक सुधारणा कार्यक्रमांना अधिक गती देण्यात येईल, असे डॉ. रामास्वामी एन. यांनी सांगितले.
स्थानिक पशुपालकांना मोठा फायदा
राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख मिळाल्यामुळे उमरडा गोवंश आणि माडग्याळ मेंढीच्या जतन, संवर्धन व सुधारित प्रजननासाठी सरकारी स्तरावर विशेष योजना आणि निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचा थेट फायदा स्थानिक पशुपालकांना होणार आहे, असे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाचा पशुसंवर्धन विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर तसेच विविध संशोधन संस्थांनी केलेल्या प्रदीर्घ अभ्यास आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या निर्णयामुळे मोठे यश मिळाले आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या विशेष योजनांमधून या प्रजातींच्या शास्त्रीय संवर्धन, प्रजनन सुधारणा आणि गुणवत्ता वाढीसाठी आता अधिक प्रभावीपणे काम करता येणार आहे. त्यामुळे पशुपालकांचे उत्पन्न वाढण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
काय आहे उमरडा गोवंश?
उमरडा गोवंशाला पश्चिम विदर्भातील स्थानिक पशुधन म्हणून विशेष महत्त्व आहे. १९१० मधील अमरावती जिल्ह्याच्या ब्रिटिशकालीन गॅझेटमधील नोंदींमधून उमरडा गोवंशाचे अस्तित्व गेल्या शतकापासून असल्याचे दिसून येते.
यवतमाळ, अमरावती आणि वाशीम जिल्ह्यांच्या परिसरात हा गोवंश मोठ्या प्रमाणावर आढळतो. उंचपुरी अंगकाठी आणि पांढऱ्याशुभ्र रंगाचे हे गोधन बंजारा समाजासह स्थानिक पशुपालक पारंपरिक पद्धतीने पाळतात.
वाशीम जिल्ह्यातील ‘उंबर्डा बाजार’ या पशुधन बाजारपेठेवरून ‘उमरडा’ हे नाव या गोवंशाला मिळाल्याचे सांगितले जाते. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यामुळे त्याला ‘दिग्रस’ गोवंश, तर बंजारा समाजाच्या पारंपरिक पालनामुळे ‘बंजारा गोवंश’ असेही संबोधले जाते.
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, दारव्हा व आर्णी, वाशीम जिल्ह्यातील मानोरा, मंगरुळपीर व कारंजा (लाड), तसेच अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात उमरडा गोवंश मोठ्या प्रमाणावर आढळतो.
माडग्याळ मेंढीची वैशिष्ट्ये
माडग्याळ मेंढी ही मुख्यतः धनगर आणि रामोशी समाजातील मेंढपाळ व शेतकऱ्यांकडून पाळली जाते. या मेंढ्यांचे कळप प्रामुख्याने स्थलांतरित स्वरूपाचे आहेत.
विषम हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता, उत्तम रोगप्रतिकारशक्ती, जलद वजनवाढ, कोकरांच्या जगण्याचे चांगले प्रमाण आणि मातृत्वाची उत्तम प्रवृत्ती ही माडग्याळ मेंढीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे कळप व्यवस्थापन आणि मटण उत्पादनासाठी ही प्रजाती विशेष फायदेशीर मानली जाते.
मेंढपाळांच्या मते, सुमारे १०० वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील माडग्याळ आणि सनमाडी परिसरात स्थानिक मेंढपाळांनी निवड पैदास पद्धतीने या मेंढीची पैदास विकसित केली.
माडग्याळ मेंढी महाराष्ट्रातील मोठ्या आकाराच्या आणि मटणासाठी लोकप्रिय मेंढ्यांपैकी एक आहे. प्रामुख्याने पांढऱ्या रंगावर तपकिरी ठिपके असलेली मेंढी आढळते, तर काही मेंढ्या पूर्णपणे तपकिरी रंगाच्या देखील दिसतात.
पशुधन संवर्धनाला नवी दिशा
उमरडा गोवंश आणि माडग्याळ मेंढीला मिळालेली राष्ट्रीय मान्यता ही केवळ दोन स्थानिक पशुधन प्रजातींची अधिकृत नोंदणी नसून, महाराष्ट्राच्या पारंपरिक पशुधन ज्ञानाला आणि पशुपालकांच्या पिढ्यान्पिढ्यांच्या योगदानाला मिळालेली राष्ट्रीय पावती मानली जात आहे.
या मान्यतेच्या माध्यमातून शास्त्रीय संशोधन, सुधारित प्रजनन, गुणवत्तावाढ, संवर्धन आणि सरकारी योजनांचा लाभ यांना गती मिळाल्यास महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि पशुपालकांच्या उत्पन्नाला मोठा हातभार लागू शकतो.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0