जलसंपदा विभागाच्या शेतकरीसंबंधित सर्व प्रक्रिया महिनाभरात होणार ऑनलाइन; मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा
जलसंपदा विभागामार्फत शेतकऱ्यांशी संबंधित सर्व प्रक्रिया येत्या महिनाभरात ऑनलाइन करण्यात येणार असल्याची घोषणा जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हापुरात केली.
कोल्हापूर प्रतिनिधी उमेश जाधव
कोल्हापूर, दि. २६ (जिमाका) : जलसंपदा विभागाशी संबंधित शेतकऱ्यांच्या सर्व सेवा आणि प्रक्रिया येत्या महिनाभरात पूर्णपणे ऑनलाइन करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत मुख्य अभियंता (जलसंपदा) कृष्णा खोरे विभाग, कोल्हापूर येथील नव्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, अशोक माने, अमल महाडिक, माजी आमदार संजय घाटगे, तसेच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत धुमाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, कृष्णा व गोदावरी खोरे विकास महामंडळाची सुमारे ५६ हजार एकर जमीन जलसंपदा विभागाच्या नावे हस्तांतरित करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. राज्यातील दुष्काळग्रस्त भागांमधील पाणी विषमता दूर करण्यासाठी जलसंपदा विभाग प्राधान्याने काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
धरणांशी संबंधित कामकाज अधिक प्रभावी व्हावे यासाठी जलसंपदा विभागाचे अधिकारी धरण परिसरातच कार्यरत राहतील, अशा नियोजनावरही काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर हा सहकार चळवळीचा बालेकिल्ला असल्याचे नमूद करत त्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींनाही उजाळा दिला.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काळमवाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांच्या अस्तरीकरणास मंजुरी देऊन सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार कामे तातडीने सुरू करण्याची मागणी केली. तसेच कोल्हापूर शहरातील ब्ल्यू आणि रेड लाईन प्रश्नावर ठोस निर्णय घेण्याबरोबरच अलमट्टी धरणासंदर्भातील प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयात प्रभावी बाजू मांडण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आवाहन त्यांनी केले.
खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरमध्ये मुबलक पाणीसाठा असला तरी जिल्ह्यात अनेक सूक्ष्म सिंचन प्रकल्पांची गरज असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांमध्ये पाण्याच्या कार्यक्षम वापराबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता असून, कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढू नये, यासाठी राज्याने सातत्याने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी नमूद केले. कोल्हापूर येथे विभागीय कार्यालय सुरू केल्याबद्दल त्यांनी डॉ. विखे पाटील यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात मुख्य अभियंता (जलसंपदा) अलका अहिरराव यांनी सांगितले की, कोल्हापूर येथे विभागीय कार्यालय सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनविषयक प्रश्नांचे जलद निराकरण होण्यास मदत होईल. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कोल्हापूर, सांगली आणि सातारा हे तीन जिल्हे असणार आहेत.
कार्यक्रमापूर्वी डॉ. विखे पाटील यांनी सिंचन भवन येथील अत्याधुनिक विभागीय कार्यालयाची पाहणी करून वृक्षारोपण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले, तर अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी आभार मानले. यावेळी तत्कालीन अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, उपअधीक्षक अभियंता संजय पाटील, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्यासह कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0