१४ वी नाशिक–पंढरपूर सायकल वारी १० जुलैपासून; ५ हजारांहून अधिक सायकलपटूंचा सहभाग
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे १० ते १२ जुलै २०२६ दरम्यान १४ वी नाशिक–पंढरपूर सायकल वारी आयोजित करण्यात आली आहे. ३७५ किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या वारीत २७० सायकल वारकरी सहभागी होणार असून, पंढरपूर येथे ५ हजारांहून अधिक सायकलपटूंच्या उपस्थितीत भव्य सायकल रिंगण सोहळा पार पडणार आहे.
नाशिक | ब्यूरो :
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे १४ वी नाशिक–पंढरपूर सायकल वारी दिनांक १०, ११ आणि १२ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली असून, यावर्षी सुमारे २७० सायकल वारकरी ३७५ किलोमीटरचा प्रवास करत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. या उपक्रमाची माहिती फाउंडेशनच्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष अमित नारायण घुगे आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
या उपक्रमाची सुरुवात २०१२ मध्ये संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय हरीश बैजल यांच्या दूरदृष्टीतून झाली. गेल्या १४ वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या सायकल वारीद्वारे वारकरी परंपरा, पर्यावरण संवर्धन, आरोग्यदायी जीवनशैली आणि सायकल संस्कृतीचा प्रचार-प्रसार सातत्याने केला जात आहे.
वारीच्या पहिल्या दिवशी सायकलपटू नाशिक–सिन्नर–नांदूर–लोणी–राहुरी मार्गे अहिल्यानगर येथे पोहोचतील आणि तेथे पहिला मुक्काम असेल. दुसऱ्या दिवशी अहिल्यानगर–करमाळा–टेंभुर्णी मार्गे पंढरपूर येथे सायकल वारी पोहोचणार आहे.
गेल्या तीन वर्षांपासून नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या पुढाकारातून पंढरपूर येथे भव्य सायकल रिंगण सोहळा आयोजित केला जात आहे. वारकरी परंपरेतील रिंगण सोहळ्यापासून प्रेरणा घेऊन सुरू करण्यात आलेला हा उपक्रम आज राज्यभरातील सायकलप्रेमींसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे.
१२ जुलै रोजी सकाळी ६ वाजता महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेले सायकलपटू पंढरपूर शहरात एकत्र येऊन नगरप्रदक्षिणा करतील. त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत भव्य सायकल रिंगण सोहळा पार पडणार आहे. यंदा राज्यातील सुमारे १३० सायकल क्लब या सोहळ्यात सहभागी होणार असून ५ हजारांहून अधिक सायकलिस्ट उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी सुमारे ४ हजार सायकलिस्ट सहभागी झाले होते.
रिंगण सोहळ्यानंतर सायकलिस्ट संमेलन आयोजित करण्यात येणार असून, वर्षभर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सायकलपटूंचा यावेळी गौरव व सत्कार करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे आज महाराष्ट्रातील विविध सायकल क्लब आणि सायकलप्रेमी मोठ्या संख्येने पंढरपूर येथे एकत्र येत आहेत. वारकरी संप्रदायातील रिंगण सोहळ्याप्रमाणेच सायकल रिंगण हा आता सायकल संस्कृती, पर्यावरण संरक्षण, आरोग्यदायी जीवनशैली आणि सामाजिक ऐक्याचा उत्सव बनला आहे.
वारीदरम्यान सहभागींच्या सुरक्षिततेसाठी वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका, सायकल मेंटेनन्स टीम, सहाय्यक वाहने, पिण्याचे पाणी, अल्पोपहार तसेच स्वयंसेवकांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
"आरोग्यासाठी सायकल, पर्यावरणासाठी सायकल" हा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे, प्रदूषणमुक्त जीवनशैलीचा प्रसार करणे आणि अधिकाधिक नागरिकांना सायकल वापरण्यास प्रेरित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला अमित नारायण घुगे, अश्विनी कोंडेकर, दविंदर सिंग भेला, नितीन कोटकर, माधुरी गडाख, दिपाली माळी, सीमा घुगे, कारभारी भोर, सुरेश डोंगरे, शुभम भालेराव तसेच संस्थेचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
याच दिवशी सायंकाळी शिवशक्ती सायकल कॉम्प्लेक्स येथे नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे माजी अध्यक्ष स्वर्गीय जसपाल सिंग वर्दी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
2