पेपर लीक करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा देणारा कायदा करा; आकाश छाजेड यांची मागणी
नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी पेपर लीक करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा करण्याची मागणी केली आहे. दोषींना जन्मठेपेची शिक्षा देण्याचे प्रावधान असावे तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
नाशिक ब्यूरो
नीटसारख्या महत्त्वाच्या परीक्षेचा पेपर लीक झाल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून, या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे पेपर लीक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणारा विशेष कायदा त्वरित करण्यात यावा, अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात आकाश छाजेड यांनी म्हटले आहे की, मेडिकल क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी अनेक वर्षे मेहनत घेत असतात. मात्र पेपर लीकच्या घटनांमुळे त्यांच्या परिश्रमांवर पाणी फिरते आणि विद्यार्थ्यांना मोठा मानसिक धक्का बसतो. त्यामुळे अशा गुन्ह्यांकडे केवळ आर्थिक गैरव्यवहार म्हणून न पाहता विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारा गंभीर गुन्हा म्हणून पाहिले पाहिजे.
पेपर लीक प्रकरणात सहभागी असलेल्या दोषींना जन्मठेपेची शिक्षा देण्याचे प्रावधान असलेला कठोर कायदा केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने करावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करून यामागे कोणते राजकीय वरदहस्त किंवा प्रशासनातील अधिकारी सहभागी आहेत का, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच दोषींना त्वरित अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी, असेही त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने त्वरित नव्याने नीट परीक्षा आयोजित करावी, अशी मागणी करत काँग्रेस पक्ष लवकरच राज्यपालांकडे निवेदन देणार असल्याचे आकाश छाजेड यांनी सांगितले.
दरम्यान, नाशिक जिल्हा एनएसयूआय संघटनेच्या वतीने नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधून लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0