महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची देवनार बायोमायनिंग प्रकल्प व कन्नमवार नगर स्वच्छता चौकीला भेट

महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी देवनार बायोमायनिंग प्रकल्पाची पाहणी करत घनकचरा व्यवस्थापनाचा आढावा घेतला. तसेच विक्रोळी येथील कन्नमवार नगर स्वच्छता चौकीला भेट देऊन स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

May 13, 2026 - 22:13
 0  10
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची देवनार बायोमायनिंग प्रकल्प व कन्नमवार नगर स्वच्छता चौकीला भेट
अश्विनी भिडे, देवनार बायोमायनिंग प्रकल्प, देवनार क्षेपणभूमी, घनकचरा व्यवस्थापन, कन्नमवार नगर, विक्रोळी पूर्व, मुंबई

मुंबई, दि. १३ मे २०२६ :

महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी देवनार येथील बायोमायनिंग प्रकल्पाची पाहणी करून घनकचरा व्यवस्थापनाच्या कामकाजाचा आढावा घेतला.

देवनार क्षेपणभूमी सन १९२७ पासून कार्यरत असून तिचे क्षेत्रफळ सुमारे १२० हेक्टर इतके आहे. येथे सध्या दररोज सुमारे ६०० मेट्रिक टन नागरी घनकचरा स्वीकारला जात असून सुमारे १८५ लाख मेट्रिक टन जुना कचरा साठलेला आहे.

या साचलेल्या जुन्या घनकचऱ्यावर (Legacy Waste) महानगरपालिकेच्या वतीने बायोमायनिंग प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत जुन्या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने वर्गीकरण करून त्यातून माती, पुनर्वापरयोग्य साहित्य आणि उर्वरित कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात आहे.

बायोमायनिंगमुळे क्षेपणभूमीवरील कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होत असून पर्यावरणीय प्रदूषणात घट करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

यानंतर महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी एस विभागातील विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर स्वच्छता कामगार चौकीला आकस्मिक भेट देऊन पाहणी केली.

यावेळी त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या उपस्थितीची नोंद, कामाचे स्वरूप, कामकाजाच्या वेळा, आवश्यक साहित्याचा पुरवठा तसेच उपलब्ध सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.

मुंबईतील रस्ते, चौक आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी व्यापक पातळीवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच कचरा साचणाऱ्या ठिकाणांची ओळख करून त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी जनजागृती मोहिमा प्रभावीपणे राबविणे आवश्यक असल्याचे सांगत नागरिकांच्या सहभागातून परिसर स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0