भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय महामंत्री युद्धवीर सिंह यांची मराठा समन्वय परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत वैचारिक भेट
भारतीय किसान युनियन (तिकैत) चे राष्ट्रीय महामंत्री युद्धवीर सिंह यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी मराठा समन्वय परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलास पाटील आणि पदाधिकाऱ्यांची वैचारिक बैठक झाली. बैठकीत शेतकरी चळवळ, सामाजिक परिवर्तन आणि देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली.
नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारतीय किसान युनियन (तिकैत) चे राष्ट्रीय महामंत्री युद्धवीर सिंह यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी मराठा समन्वय परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची वैचारिक बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय पदाधिकारी चंद्रशेखर नलावडे पाटील, रूपाली पाटील तसेच मराठा समन्वय परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलास पाटील उपस्थित होते.
बैठकीदरम्यान शेतकरी, पशुपालक आणि ग्रामीण समाजाच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी आणि पशुपालक समाजाच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी सर छोटूराम, सरदार वल्लभभाई पटेल, विठ्ठलभाई पटेल, डॉ. पंजाबराव देशमुख आणि महेंद्रसिंह टिकैत यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी चळवळींनी देशातील अन्नदात्यांमध्ये जागृती निर्माण केल्याचे सांगण्यात आले.
चर्चेदरम्यान महाराष्ट्रातील शेतकरी चळवळींचाही संदर्भ देण्यात आला. महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील शेतकऱ्यांनी विविध नेतृत्वाकडून अपेक्षा ठेवल्या, मात्र आजही अनेक शेतकरी आर्थिक संकटामुळे आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयाला सामोरे जात असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
देशातील शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. शेतकरी, पशुपालक आणि ग्रामीण समाजाच्या हितासाठी व्यापक जनजागृती व संघटनात्मक बळकटी आवश्यक असल्याचेही बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0