जनगणना २०२७ साठी बीएमसीची जनजागृती मोहीम; कर्मचाऱ्यांनी ‘स्व-गणना ॲम्बेसेडर’ बनावे – आयुक्त अश्विनी भिडे
जनगणना २०२७ अंतर्गत स्व-गणना प्रक्रियेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने व्यापक जनजागृती मोहीम सुरू केली असून, महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी ‘स्व-गणना सदिच्छादूत’ म्हणून काम करावे, असे आवाहन आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘जनगणना - २०२७’ अंतर्गत स्व-गणनेची प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी स्व-गणना प्रक्रियेचे सदिच्छादूत (ॲम्बेसेडर) म्हणून काम करावे, असे आवाहन केले आहे.
महानगरपालिका मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी उपायुक्त प्रशांत गायकवाड, उपायुक्त शरद उघडे, सहसंचालक (जनगणना) संतोष पायस, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जनगणना २०२७ साठी आवश्यक मनुष्यबळ, प्रशिक्षण आणि जनजागृती उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. आतापर्यंत मुंबई शहरात २४ हजार २८५ आणि उपनगरात ४६ हजार ३७२ नागरिकांनी स्व-गणना प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे.
महानगरपालिका क्षेत्रात स्व-गणनेचा पहिला टप्पा १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरयादी आणि घरगणना प्रक्रिया सुरू होणार आहे.
आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यातील यशस्वी अंमलबजावणीमुळे दुसरा टप्पा अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होईल. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी स्व-गणनेत सहभागी होणे आवश्यक आहे.
यासाठी नागरी सुविधा केंद्रे (CFC), प्रशासकीय कार्यालये, महानगरपालिका आस्थापना, सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच सार्वजनिक ठिकाणी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मेट्रो स्थानके, रेल्वे स्टेशन, बस स्थानके आणि गर्दीच्या भागांमध्ये स्व-गणनेबाबत माहिती देण्यावर भर देण्यात येणार आहे.
तसेच समाजमाध्यमे आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून स्व-गणनेच्या संकेतस्थळाची लिंक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य सेविकांच्या माध्यमातूनही नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवली जाणार आहे.
महानगरपालिका प्रशासनाने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्व-गणना मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0