डॉकयार्ड रोड फायरिंग प्रकरणातील दोन आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक
डॉकयार्ड रोड परिसरात फायरिंग करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे शाखा, मुंबईने दोन आरोपींना अटक केली असून गुन्ह्यात वापरलेले हत्यार, मोटारसायकल आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई, दि. १३ मे २०२६ :
डॉकयार्ड रोड परिसरात एका व्यक्तीवर फायरिंग करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे शाखा, मुंबईने अवघ्या काही तासांत कारवाई करत दोन आरोपींना अटक करून गुन्ह्याचा उलगडा केला आहे.
भायखळा पोलीस ठाण्यात गु.र.क्र. २५८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ३०८, ३(५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(अ), १३५ तसेच शस्त्र अधिनियम कलम ३, २५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दिनांक १२ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता फिर्यादी समीर मोहम्मद असीफ खान (वय ४१ वर्षे) यांच्यावर डॉकयार्ड रोड, मिनाक्षी अपार्टमेंट, माझगाव, मुंबई येथे एका अज्ञात इसमाने फायरिंग करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
या घटनेनंतर गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण तसेच मानवी गुप्त माहितीच्या आधारे आरोपी क्रमांक १ (वय ३० वर्षे) याने फायरिंग केल्याचे, तर आरोपी क्रमांक २ (वय ३३ वर्षे) हा त्याचा साथीदार असल्याचे निष्पन्न झाले.
तपासादरम्यान आरोपी माहिम दर्गा परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने सापळा रचून दिनांक १३ मे २०२६ रोजी मध्यरात्री दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार, मोटारसायकल तसेच मोबाईल फोन जप्त करण्यात येत असून पुढील तपास गुन्हे शाखा, युनिट-३ कडून सुरू आहे.
ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन आणि सहायक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत कक्ष-३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर, कक्ष-२ चे प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस निरीक्षक शरद धराडे, पोलीस निरीक्षक सुहास माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळी, रामदास कदम, राकेश देशमुख तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

