आरोग्य विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांचा पदग्रहण समारंभ संपन्न; संशोधनाधारित व विद्यार्थी-केंद्रित शिक्षणाला प्राधान्य

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांचा पदग्रहण समारंभ नाशिक येथे संपन्न झाला. संशोधनाधारित उपक्रम, विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, पारदर्शक प्रशासन आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षणाला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Aug 5, 2026 - 23:09
 0  8
आरोग्य विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांचा पदग्रहण समारंभ संपन्न; संशोधनाधारित व विद्यार्थी-केंद्रित शिक्षणाला प्राधान्य
डॉ. व्यंकट गिते, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, आरोग्य विद्यापीठ, कुलगुरू पदग्रहण समारंभ, नाशिक,

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नवनियुक्त कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांचा पदग्रहण समारंभ विद्यापीठात उत्साहात संपन्न झाला. आरोग्य शिक्षणामध्ये संशोधनाधारित उपक्रम, पारदर्शक प्रशासकीय कामकाज आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन डॉ. गिते यांनी यावेळी केले.

पदग्रहण समारंभाला व्यासपीठावर कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांच्यासमवेत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सचिन मुंबरे, डॉ. मिलिंद आवारे, डॉ. यशवंत पाटील, डॉ. अजित फुंदे, डॉ. श्रीचक्रधर मुंघल, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी बोधिकिरण सोनकांबळे, डॉ. देवेंद्र पाटील आणि डॉ. अनिता गिते आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. व्यंकट गिते म्हणाले की, विद्यार्थी हा विद्यापीठाचा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांच्या गुणांना आणि क्षमतांना योग्य वाव मिळावा तसेच शिक्षणात तंत्रज्ञानाधारित प्रणालीचा प्रभावी वापर व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील. विद्यापीठात समाजोपयोगी संशोधनाला चालना देणे आवश्यक असून, संशोधक विद्यार्थ्यांना आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. संशोधनाला प्राधान्य देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आरोग्य शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी प्रभावी संवादकौशल्य आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी डॉक्टर आणि रुग्णांमधील संवाद अधिक सुलभ व संवेदनशील व्हावा, यासाठी विविध प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येतील, असे स्पष्ट केले.

विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय मानांकनात पहिल्या १०० विद्यापीठांच्या यादीत स्थान मिळावे, यासाठी संशोधन, समाजोपयोगी आरोग्य जनजागृती उपक्रम आणि ‘नॅक’च्या धर्तीवर गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही डॉ. गिते यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांच्या समस्या अधिक प्रभावीपणे आणि वेळेत सोडविण्यासाठी विद्यापीठात सिंगल विंडो सिस्टम लागू करण्यात येईल. तसेच व्हीसी पोर्टल कार्यान्वित करून विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन तक्रारींचा निपटारा करण्याची व्यवस्था विकसित केली जाईल. कार्यालयीन कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी ई-ऑफिस प्रणालीचा अवलंब करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य शिक्षणात कॉम्पिटन्सी बेस्ड मेडिकल एज्युकेशन पद्धतीवर अधिक भर देण्यात येईल. शैक्षणिक गुणवत्ता अधिक दर्जेदार करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि अभ्यागतांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. आरोग्य शिक्षण अधिक सक्षम करण्यासाठी आयआयटी, इस्रो तसेच स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्ससारख्या नामांकित संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य शिक्षणाशी संबंधित विविध योजनांचा प्रभावी उपयोग करून विद्यापीठासाठी अधिक निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यामुळे विद्यापीठाला अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नवी दिशा मिळेल, असा विश्वास डॉ. गिते यांनी व्यक्त केला.

नाशिक येथे होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांच्या सहकार्याने आरोग्यविषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात येतील. आपत्ती व्यवस्थापनावर कार्यशाळा, मोटारसायकल ॲम्ब्युलन्स सेवा आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यासाठी प्रेरित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आजही तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित उपक्रमांसाठी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांना योग्य व्यवस्थापन, मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. विद्यापीठात ई-क्लासरूम सुरू झाल्यास एकाच वेळी हजारो विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन मिळू शकेल आणि त्याचा भविष्यात मोठा लाभ होईल, असे त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी ‘टेलिमानस’ योजनेचा प्रभावीपणे अवलंब करण्यात येईल. “विद्यापीठ ही विद्यार्थ्यांची स्वप्ने घडविणारी शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेचा भाग म्हणून प्रत्येकाने प्रामाणिकपणे, तत्परतेने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास येणाऱ्या काळात विद्यापीठाला नव्या उंचीवर घेऊन जाता येईल,” असा विश्वास डॉ. गिते यांनी व्यक्त केला.

यावेळी कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांच्या मातोश्री श्रीमती शाहूबाई अर्जुनराव गिते यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. अनिता गिते आणि बंधू भास्कर गिते यांचा विद्यापीठाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

डॉ. व्यंकट गिते यांना ज्ञानदान करून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या त्यांच्या शिक्षक आणि गुरुजनांचाही यावेळी कुलगुरूंच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये डॉ. पुरुषोत्तम दराख, डॉ. श्रीराम कंडी, डॉ. अनुराधा कंडी, डॉ. जे. एस. कंडी, डॉ. मलिक, डॉ. गौरांग शहा, डॉ. पळनीटकर, डॉ. एन. डी. कुलकर्णी, डॉ. पंकज माहेश्वरी, डॉ. प्रविणकुमार वासाडीकर, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. अजय बोराळकर, डॉ. किरण पाटोळे, डॉ. स्वप्नाली कदम, डॉ. गणेश जाधव, डॉ. सचिन देवरे, डॉ. अनिल सानप आणि डॉ. अशोक थोरात यांचा समावेश होता.

कार्यक्रमात नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, विद्यापीठ शैक्षणिक कक्षाच्या अधिष्ठाता डॉ. स्वाती जाधव, एमपीआयचे अधिष्ठाता डॉ. किरण पाटोळे, नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संदीप गुंडरे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून नवनियुक्त कुलगुरूंना शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव विजय उकलगावकर, उद्योगमंत्र्यांचे सचिव डॉ. प्रशांत रुमाले, विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, आरोग्य क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी नवनियुक्त कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांचा परिचय करून दिला. त्यानंतर विद्यापीठाचा मानदंड नवनियुक्त कुलगुरूंकडे सुपूर्द करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले, तर देवेंद्र पाटील यांनी आभार मानले.

या पदग्रहण समारंभास विविध क्षेत्रांतील मान्यवर, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, विद्यार्थी, शिक्षक तसेच विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवनियुक्त कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.