ड्रग फ्री मुंबई’ अभियानाला रेल्वे प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मुंबई सेंट्रलसह विविध स्थानकांवर जनजागृती रॅली
ड्रग फ्री मुंबई’ जनजागृती अभियानांतर्गत मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी विविध रेल्वे स्थानकांवर क्यूआर कोडद्वारे शपथ, जनजागृती कार्यक्रम आणि अंमली पदार्थविरोधी रॅली आयोजित केली. या उपक्रमाला रेल्वे प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मुंबई ब्यूरो | अनिल सावरे
मुंबई, दि. ३० : अंमली पदार्थमुक्त मुंबई घडविण्याच्या उद्देशाने मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांतर्फे ‘ड्रग फ्री मुंबई’ जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत विविध रेल्वे स्थानकांवर क्यूआर कोडद्वारे अंमली पदार्थविरोधी शपथ घेण्यात आली. तसेच रेल्वे प्रवासी, पोलीस मित्र, रेल्वे सुरक्षा बल आणि पोलिसांच्या सहभागातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या उपक्रमाला रेल्वे प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी, दि. ३० जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० वाजेदरम्यान हा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
अभियानाची सुरुवात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी शपथ घेऊन करण्यात आली. त्यानंतर मुंबई सेंट्रल टर्मिनसच्या मेन लाईन जनरल हॉल, मेन हॉल परिसर आणि बुकिंग हॉलमध्ये जनजागृती करण्यात आली. मुंबई सेंट्रल लोकल लाईन रेल्वे स्थानकासह महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, दादर पश्चिम, माटुंगा रोड आणि माहिम रेल्वे स्थानकांवरील फलाटांवरही अभियान राबविण्यात आले.
या कार्यक्रमात रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे प्रवासी, पोलीस मित्र सदस्य तसेच अंमली पदार्थविरोधी पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते. उपस्थितांनी क्यूआर कोड स्कॅन करून ‘ड्रग फ्री मुंबई’ची शपथ घेतली. तसेच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत माहिती देऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
यानंतर सर्व उपस्थितांच्या सहभागातून रेल्वे स्थानक परिसरात अंमली पदार्थविरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली. अंमली पदार्थमुक्त मुंबई घडविणे, रेल्वे प्रवाशांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करणे आणि रेल्वे प्रवासी व पोलीस मित्रांचा सक्रिय सहभाग वाढविणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश होता.
या उपक्रमासाठी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र मा. काटकर यांच्यासह तीन पोलीस अधिकारी आणि ४० पोलीस अंमलदार उपस्थित होते. तसेच रेल्वे सुरक्षा बलाचा एक अधिकारी व पाच कर्मचारी, सुमारे २०० रेल्वे प्रवासी, २० ते ३० पोलीस मित्र सदस्य आणि पत्रकार बांधवांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
अंमली पदार्थविरोधी जनजागृती अभियानाला रेल्वे प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे चित्रीकरणही करण्यात आले असल्याची माहिती मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र मा. काटकर यांनी दिली.
What's Your Reaction?
Like
5
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0