सूक्ष्म व लघु उत्पादन उद्योगांनी फ्लॅटेड फॅक्टरी भाडे अनुदान योजनेचा लाभ घ्यावा : सुनिता फाल्गुने
नाशिकमध्ये आयोजित कार्यशाळेत महाराष्ट्र चेंबरच्या उपाध्यक्षा सुनिता फाल्गुने यांनी सूक्ष्म व लघु उत्पादन उद्योगांना फ्लॅटेड फॅक्टरी भाडे अनुदान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. पात्र उद्योगांना मासिक भाड्याच्या ३० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार असून अर्जाची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ आहे.
नाशिक | ब्युरो
उद्योजक बनणे ही काळाची गरज असून सूक्ष्म व लघु उत्पादन उद्योगांनी महाराष्ट्र शासनाच्या फ्लॅटेड फॅक्टरी भाडे अनुदान योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरच्या उपाध्यक्षा सौ. सुनिता फाल्गुने यांनी केले.
नाशिक येथे आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी सांगितले की, उद्योजक प्रामाणिकपणे उद्योग उभारण्यासाठी आणि वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. केंद्र व राज्य सरकार विविध योजनांद्वारे त्यांना पाठबळ देत असून महाराष्ट्र चेंबरही शासनाच्या सहकार्याने उद्योजकांच्या विकासासाठी कार्यरत आहे. फ्लॅटेड फॅक्टरी भाडे अनुदान योजना ही सूक्ष्म व लघु उत्पादन उद्योगांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून या माध्यमातून त्यांना मोठी आर्थिक मदत मिळणार आहे.
या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज mssidc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करता येणार असून मार्गदर्शनासाठी Business Facilitation Centre (BFC), नाशिक तसेच महाराष्ट्र चेंबरशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यशाळेत बिझनेस फॅसिलिटेशन सेंटरच्या व्यवस्थापक श्रद्धा वाघ यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत MSSIDC आणि Maharashtra RAMP Programme अंतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे. उद्यम (Udyam) नोंदणीकृत पात्र सूक्ष्म व लघु उत्पादन उद्योगांना कारखान्याच्या मासिक भाड्याच्या ३० टक्क्यांपर्यंत, कमाल ३० हजार रुपये प्रतिमहिना अनुदान देण्यात येणार आहे.
योजनेसाठी भाडे करारनामा, उद्यम प्रमाणपत्र, जीएसटी प्रमाणपत्र, पॅन कार्ड आणि किमान पाच कामगार असणे आवश्यक आहे. पाच वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीपासून कार्यरत असलेल्या उत्पादन उद्योगांना प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ असून पात्र उद्योजकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे आयोजित ही कार्यशाळा १३ जुलै २०२६ रोजी दुपारी ४ वाजता मुंबईनाका, नाशिक येथील चेंबरच्या कार्यालयात पार पडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सुनिता फाल्गुने होत्या. यावेळी राज्य मुख्य समन्वयक वेदांशू पाटील, शाखा चेअरमन अंजु सिंघल, तांत्रिक व्यवस्थापक सुशीलकुमार गोसावी, क्षेत्रीय अधिकारी देविदास मिस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.
शाखा चेअरमन अंजु सिंघल यांनी स्वागत केले, तर वेदांशू पाटील यांनी उपस्थित उद्योजक, चेंबरचे सदस्य आणि कार्यकारिणी सदस्यांचे आभार मानले.
कार्यशाळेला सचिन शहा, सत्यजित महाजन, संजय बघे, महेंद्र बच्छाव, डॉ. सोनल दगडे, आशुतोष गायकवाड, संदीप सोमवंशी, मनोज आमले, दिपाली चांडक, राजेश सिंघल, विजय गायकवाड, दत्ता भालेराव, वासुदेव भगत, कल्पेश लोया, महेश सावरीकर, डॉ. मिथिला कापडणीस, दिलीप साळवेकर, अविनाश पाठक यांच्यासह मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0