आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाला बळ; तारक्का आणि मदनी तोरेम यांना शिधापत्रिकेचे वितरण

गडचिरोली जिल्ह्यात आत्मसमर्पित नक्षलवादी तारक्का उर्फ विमल चंद्रा सिडाम आणि मदनी गणपत तोरेम यांना शिधापत्रिकेचे वितरण करण्यात आले. या माध्यमातून त्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेसह विविध शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Jul 8, 2026 - 23:36
 0  5
आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाला बळ; तारक्का आणि मदनी तोरेम यांना शिधापत्रिकेचे वितरण
गडचिरोली, आत्मसमर्पित नक्षलवादी, पुनर्वसन, शिधापत्रिका,

प्रतिनिधी : नरेश शिंदे 

गडचिरोली | दि. ८ जुलै २०२६ (जिमाका)

राज्य शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणांतर्गत आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आणखी बळ मिळाले आहे. या उपक्रमांतर्गत तारक्का उर्फ विमल चंद्रा सिडाम आणि मदनी गणपत तोरेम यांना शिधापत्रिका मंजूर करून त्यांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे त्यांना विविध शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अहेरी तहसील कार्यालयात तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या हस्ते बुधवारी (८ जुलै) शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तारक्का उर्फ विमल चंद्रा सिडाम या पूर्वी नक्षल चळवळीतील दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीच्या सदस्य म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी १ जानेवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले होते. त्यांचे पती सोनू उर्फ भूपती यांनीही १५ ऑक्टोबर २०२५ रोजी आत्मसमर्पण करून विकासाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश केला होता.

राज्य शासनाच्या पुनर्वसन धोरणानुसार आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना आवश्यक शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून देत विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे.

शिधापत्रिका मिळाल्यामुळे लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेसह विविध शासकीय योजना, अनुदाने आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळत असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात स्थिरपणे सामावून घेण्यास मदत होणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0