गणेशमूर्ती विसर्जन स्थळी सुरक्षितता व पर्यावरण संवर्धनावर भर; आयुक्त अश्विनी भिडे

मुंबईतील गणेशमूर्ती विसर्जन स्थळांवर गणेशभक्तांच्या सुविधांसह सुरक्षितता आणि पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले. गिरगाव व दादर चौपाटीची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी व्यवस्थेचा आढावा घेतला.

Sep 17, 2026 - 18:54
 0  6
गणेशमूर्ती विसर्जन स्थळी सुरक्षितता व पर्यावरण संवर्धनावर भर; आयुक्त अश्विनी भिडे
गणेश विसर्जन मुंबई, BMC गणेश विसर्जन, अश्विनी भिडे, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, गणेश विसर्जन व्यवस्था, गणेशभक्त सुविधा, कृत्रिम तलाव,

प्रतिनिधी: देवानंद शिंदे 

मुंबई, दि. १६ सप्टेंबर २०२६ : श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी मुंबईतील विविध विसर्जन स्थळांवर येणाऱ्या गणेशभक्तांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देतानाच सुरक्षितता आणि पर्यावरण संवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचना बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिल्या.

गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) आणि दादर चौपाटी येथील विसर्जन स्थळांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी गणेशभक्तांच्या सुविधांसाठी करण्यात आलेल्या विविध व्यवस्थांचा तसेच सुरक्षा उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला.

विसर्जन स्थळी उभारण्यात आलेले निरीक्षण मनोरे, तराफे, निर्माल्य कलश आणि मिरवणुकीसाठी अंथरण्यात आलेल्या स्टील प्लेट्स सुस्थितीत व सुसज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. विसर्जन स्थळांवरील गर्दी आणि आवश्यकता लक्षात घेऊन पुरेशा संख्येने तराफे उपलब्ध ठेवावेत, तसेच योग्य आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था सुनिश्चित करावी, असेही त्यांनी सांगितले.

गणेशभक्तांसाठी पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था

विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था ठेवण्यासोबतच जलसुरक्षेसाठी आवश्यक संख्येने प्रशिक्षित जीवरक्षक तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र फिरत्या शौचालयांची व्यवस्था उपलब्ध करून देताना विसर्जन स्थळी येणाऱ्या नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

निर्माल्य संकलनासाठी जनजागृती

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने विसर्जन स्थळी निर्माल्य कलशांची संख्या वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी नदी, समुद्र किंवा परिसरात निर्माल्य न टाकता केवळ निर्माल्य कलशांमध्येच जमा करावे, यासाठी प्रभावी जनजागृती करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले.

विसर्जन स्थळी संकलित होणाऱ्या निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याची सूचनाही त्यांनी केली.

लहान मूर्तींसाठी कृत्रिम तलाव; मोठ्या मूर्तींसाठी मोफत क्रेन

मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ आणि कचरामुक्त राहावेत यासाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लहान श्रीगणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी जास्तीत जास्त कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यास सांगण्यात आले आहे.

मोठ्या श्रीगणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी गणेशभक्तांना क्रेनची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

विसर्जन प्रक्रिया सुरक्षित आणि शिस्तबद्ध ठेवण्यावर भर

गणेशमूर्ती विसर्जनाच्या कालावधीत महापालिका यंत्रणेने सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. विसर्जन प्रक्रिया सुरळीत, शिस्तबद्ध आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय राखून आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.

गणेशोत्सवाच्या कालावधीत विसर्जन स्थळी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक नागरी सेवा-सुविधा तत्परतेने उपलब्ध करून देणे, पर्यावरणपूरक विसर्जनाला चालना देणे आणि नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी सर्व संबंधित विभागांनी दक्षतेने कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या पाहणी दौऱ्यात उपायुक्त प्रशांत गायकवाड, उपायुक्त चंदा जाधव, उपायुक्त तथा श्रीगणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे, डी विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष साळुंखे, जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश देसाई यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.