घर घर संविधान’ उपक्रमातून ४ लाख विद्यार्थ्यांपर्यंत, ८ लाख पालकांपर्यंत संविधानाची माहिती पोहोचणार

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे ‘घर घर संविधान’ उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमातून सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांपर्यंत आणि ८ लाख पालकांपर्यंत संविधानाची माहिती पोहोचविण्यात येणार आहे.

Aug 4, 2026 - 19:24
Aug 22, 2026 - 18:41
 0  10
घर घर संविधान’ उपक्रमातून ४ लाख विद्यार्थ्यांपर्यंत, ८ लाख पालकांपर्यंत संविधानाची माहिती पोहोचणार
घर घर संविधान, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, संविधान जनजागृती,

प्रतिनिधी: रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. १ ऑगस्ट २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या ‘घर घर संविधान’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांपर्यंत आणि ८ लाख पालकांपर्यंत भारतीय संविधानाची माहिती पोहोचविण्यात येणार आहे. या उपक्रमातून संविधानाधिष्ठित, जागृत आणि जबाबदार समाज घडण्यास मदत होईल, असे मत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापती रविना सागर अंगोळकर यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ‘घर घर संविधान’ उपक्रमाचा प्रारंभ आज पीसीएमसी पब्लिक स्कूल, वाल्हेकरवाडी येथे रविना अंगोळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक शेखर चिंचवडे, नगरसेविका पल्लवी वाल्हेकर, योगिता बारणे, उपायुक्त अण्णा बोदडे, शिक्षणाधिकारी संगीता बांगर, संविधान अभ्यासक तथा ‘माणगाव पॅटर्न’चे प्रमुख नूर खा पठाण, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

बालवयातच संविधानाची मूल्ये रुजणे आवश्यक – भाऊसाहेब भोईर

यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले की, संविधानाची मूल्ये आणि संविधानाच्या उद्देशिकेचा खरा अर्थ बालवयापासूनच मुलांच्या मनावर रुजणे अत्यंत आवश्यक आहे. याच उदात्त हेतूने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागामार्फत संपूर्ण महापालिका क्षेत्रात ‘घर घर संविधान’ हा प्रेरणादायी विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

बालवयातच भारतीय संविधानाची ओळख होऊन लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर झाल्यास उद्याची पिढी अधिक सुसंस्कृत, जबाबदार आणि जागरूक नागरिक म्हणून घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भावी पिढीमध्ये संविधानाबद्दलचा आदर, जागरूकता आणि कर्तव्यभावना अधिक दृढ करण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही भोईर यांनी केले.

संविधान म्हणजे देशाच्या प्रगतीचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज – नूर खा पठाण

संविधान अभ्यासक तथा ‘माणगाव पॅटर्न’चे प्रमुख नूर खा पठाण यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व स्पष्ट केले. भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून देशातील नागरिकांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रगतीचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे, असे त्यांनी सांगितले.

‘घर घर संविधान’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दररोज संविधानातील एका कलमाची माहिती आणि त्याचे सविस्तर विवेचन देण्यात येणार आहे. त्यामुळे संविधानाने नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव विद्यार्थ्यांना होईल. संविधानातील मूल्ये समजून घेऊन सुजाण, सजग आणि जबाबदार नागरिक घडण्यास या उपक्रमाची मदत होईल, असेही पठाण यांनी नमूद केले.

संविधानाधिष्ठित जागृत समाज घडविण्याचा प्रयत्न

या उपक्रमाच्या माध्यमातून संविधानाची माहिती केवळ विद्यार्थ्यांपुरती मर्यादित न राहता ती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबांपर्यंत आणि पालकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संविधान जनजागृती होऊन संविधानाधिष्ठित आणि लोकशाही मूल्यांवर आधारित जागृत समाज निर्माण होण्यास मदत होईल.

यावेळी उपायुक्त अण्णा बोदडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार शिक्षणाधिकारी संगीता बांगर यांनी मानले.

या कार्यक्रमास सेवानिवृत्त शहर अभियंता एम. टी. कांबळे, रवींद्र दुधेकर, शरद जाधव, वसंत साळवी, अनिल सूर्यवंशी यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.