कोल्हापुरात महिला बचत गटांसाठी एकदिवसीय अन्न प्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळा
कॉलेज ऑफ नॉन-कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमन, कोल्हापूरच्या फूड टेक्नॉलॉजी विभाग आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांसाठी एकदिवसीय अन्न प्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
प्रतिनिधी: उमेश जाधव
कोल्हापूर, दि. ४ : महिला बचत गटांतील महिलांना घरगुती तसेच व्यावसायिक स्तरावर स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने कॉलेज ऑफ नॉन-कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमन, कोल्हापूर येथील फूड टेक्नॉलॉजी विभाग आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय अन्न प्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा ४ ऑगस्ट २०२६ रोजी महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या प्रशिक्षण कार्यशाळेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध महिला बचत गटांतील सुमारे शंभर महिलांनी सहभाग घेतला. अन्न प्रक्रिया क्षेत्रातील विविध उत्पादनांची निर्मिती, उत्पादनाचे मूल्यनिर्धारण, पॅकेजिंग आणि ब्रँडिंग याबाबत महिलांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यशाळेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाच्या मानव्य विभाग शाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. एस. देशमुख, कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त सौ. स्वाती धुधाने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी आणि फूड टेक्नॉलॉजी विभागप्रमुख प्रा. श्वेता पाटील यांच्या उपस्थितीत रोपट्यास पाणी घालून करण्यात आले.
महिलांना घरच्या घरी अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करता यावा आणि त्यातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने कार्यशाळेत विविध व्यावसायिक उत्पादनांचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये कमर्शियल बेकरी उत्पादनांअंतर्गत मफिन्स आणि गहू बिस्किटे तयार करण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
तसेच फळे आणि भाज्यांवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. टोमॅटो केचअप, पाईनॲपल स्क्वॅश यांसारखी उत्पादने तयार करण्याच्या पद्धतींची माहिती देण्यात आली. उत्पादन तयार केल्यानंतर त्याची योग्य किंमत निश्चित करणे, आकर्षक पॅकेजिंग करणे आणि बाजारपेठेत उत्पादनाची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी प्रभावी ब्रँडिंग करणे, या विषयांवरही प्रशिक्षण देण्यात आले.
अन्न प्रक्रिया क्षेत्रात उपलब्ध असलेल्या व्यवसायाच्या संधींचा लाभ घेऊन महिलांनी स्वयंरोजगाराकडे वळावे, तसेच बचत गटांच्या माध्यमातून लघुउद्योग उभारावेत, यासाठी कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे महिलांना अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक माहिती आणि व्यावसायिक दृष्टिकोन मिळण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्वेता शाह यांनी केले. कार्यशाळेचे आयोजन फूड टेक्नॉलॉजी विभागप्रमुख प्रा. श्वेता पाटील यांनी केले.
या कार्यशाळेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, सायबर ट्रस्टचे प्रेसिडेंट व मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. आर. ए. शिंदे तसेच सेक्रेटरी सीए एच. आर. शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महिला बचत गटांतील सहभागी महिलांनी या प्रशिक्षण कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1