महाराष्ट्र दंत आरोग्य व दंत पर्यटनाचे जागतिक केंद्र बनू शकते; इंडियन डेंटल असोसिएशनने शासनाशी सहकार्य करावे – डॉ. राजेश गवांदे
महाराष्ट्रात दंत आरोग्य सेवा, दंत पर्यटन, संशोधन आणि दंत उपकरण निर्मिती क्षेत्रात जागतिक गुंतवणुकीची मोठी क्षमता असल्याचे प्रतिपादन शासनाचे सचिव डॉ. राजेश गवांदे यांनी केले. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र शासन आणि इंडियन डेंटल असोसिएशन यांच्यात दंत पर्यटनासंदर्भातील सामंजस्य करारही करण्यात आला.
मुंबई | प्रतिनिधी नरेश शिंदे
महाराष्ट्रात दंत आरोग्य सेवा, दंत पर्यटन (Dental Tourism), संशोधन व विकास तसेच दंत उपकरणांच्या उत्पादन क्षेत्रात जागतिक स्तरावरील गुंतवणुकीचे केंद्र बनण्याची मोठी क्षमता असून, या क्षेत्राच्या विकासासाठी इंडियन डेंटल असोसिएशनने (IDA) शासनाशी अधिक सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन शासनाचे राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणूक, प्रवासी भारतीय व्यवहार व जनसंपर्क विभागाचे सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे यांनी केले.
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित 'हेल्थकेअर इकोसिस्टिम अँड डेंटल टुरिझम इन महाराष्ट्र – ग्लोबल परस्पेक्टीव' या विशेष सत्रात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
यावेळी आशिया-पॅसिफिक डेंटल फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. फर्नांडो फर्नांडेझ, इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मनोज श्रीवास्तव, मानद सरचिटणीस डॉ. अशोक ढोबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शासन आणि इंडियन डेंटल असोसिएशनमध्ये सामंजस्य करार
कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र शासन आणि इंडियन डेंटल असोसिएशन यांच्यात दंत पर्यटनाला चालना देण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. तसेच इंडियन डेंटल असोसिएशन आणि सायप्रस चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्यातही करार झाला. याशिवाय दंत शिक्षण, उपचारांचे मानकीकरण, मौखिक आरोग्य निरीक्षण आणि डेंटल हायपरसेन्सिटिव्हिटी व्यवस्थापनाशी संबंधित विविध राष्ट्रीय उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.
महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी आकर्षक
डॉ. गवांदे यांनी सांगितले की, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे ६६० अब्ज डॉलर्स इतकी असून देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास ४० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येते. उद्योगस्नेही धोरणे, सक्षम पायाभूत सुविधा आणि शासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे राज्य गुंतवणूकदारांसाठी पसंतीचे ठिकाण बनले आहे.
केंद्र सरकारच्या PLI (Production Linked Incentive) योजनेअंतर्गत वैद्यकीय उपकरणांना प्रोत्साहन दिले जात असून, राज्य शासनाकडून वीज, कर आणि जमीन यांसंदर्भात विविध सवलती उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. दंत उपकरणे आणि डेंटल इम्प्लांट उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूकदारांना शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दंत पर्यटनासाठी महाराष्ट्राची मोठी संधी
भारतात येणाऱ्या एकूण वैद्यकीय पर्यटकांपैकी २७ टक्के पर्यटक महाराष्ट्रात येतात. विकसित देशांच्या तुलनेत भारतातील दंत उपचारांचा खर्च ७० ते ८० टक्के कमी असल्यामुळे परदेशी रुग्णांसाठी महाराष्ट्र आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
राज्यात सुमारे चार लाख दंतवैद्य उपलब्ध असून त्यांचे कौशल्य जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त आहे. कमी खर्च, कमी प्रतीक्षा कालावधी, जागतिक दर्जाची उपचार सेवा आणि प्रशिक्षित मनुष्यबळ यामुळे महाराष्ट्र दंत पर्यटनासाठी अधिक सक्षम होत असल्याचे डॉ. गवांदे यांनी नमूद केले.
सर्व जिल्ह्यांच्या विकासावर भर
मुख्यमंत्री यांच्या प्रादेशिक समतोल विकासाच्या धोरणानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांना विकासाच्या समान संधी मिळाव्यात यासाठी विविध प्रोत्साहनपर योजना राबविल्या जात आहेत. उद्योग क्षेत्र आणि शासन यांच्यात सातत्यपूर्ण संवाद वाढवून विविध आव्हानांवर प्रभावी उपाययोजना करता येतील, असेही डॉ. गवांदे यांनी यावेळी सांगितले.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0