मोहननगर येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज जलतरण तलाव अत्याधुनिक; महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते लोकार्पण

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोहननगर येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज जलतरण तलावाचे सुमारे ३.९१ कोटी रुपयांत नूतनीकरण पूर्ण झाले असून महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

 - 
Apr 18, 2026 - 21:07
 0  1
मोहननगर येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज जलतरण तलाव अत्याधुनिक; महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. १८ एप्रिल २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोहननगर येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज जलतरण तलाव चे अत्याधुनिक पद्धतीने नूतनीकरण पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना महापौर लांडगे यांनी शहरातील नागरिकांना अधिक आधुनिक आणि दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. मोहननगर येथील जलतरण तलावाचे नूतनीकरण हे खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा देण्याच्या व्यापक धोरणाचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, आमदार शंकर जगताप, उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, समिती सभापती कैलास कुटे तसेच नगरसदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सांगितले की, अशा सुविधा या शहराच्या क्रीडा भविष्यासाठी गुंतवणूक असून स्थानिक खेळाडूंना मोठी संधी मिळणार आहे. आमदार उमा खापरे यांनी महिलांसाठी सुरक्षित आणि आधुनिक वातावरण उपलब्ध होणार असल्याचे नमूद केले. आमदार शंकर जगताप यांनीही या प्रकल्पाचे स्वागत करत क्रीडा संस्कृती बळकट करण्यावर भर दिला.

विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनीही या विकासकामाचे स्वागत करत गुणवत्ता आणि देखभालीबाबत जागरूक राहण्याची गरज व्यक्त केली.

नूतनीकरणाची वैशिष्ट्ये:

मोहननगर जलतरण तलावाचे काम २० जून २०२४ पासून सुरू झाले होते. सुमारे ३ कोटी ९१ लाख रुपयांच्या खर्चातून तलावाची खोली कमी करणे, आच्छादन, वॉटरप्रूफिंग, नवीन फ्लोरिंग, बसण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह नूतनीकरण, अंतर्गत सुशोभीकरण, विद्युत कामे, आधुनिक फिल्टरेशन प्लांट, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि रंगरंगोटी अशी विविध कामे करण्यात आली आहेत.

या सुधारित सुविधांमुळे जलतरण तलाव अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि आकर्षक बनला असून नागरिक आणि खेळाडूंना उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती उपआयुक्त पंकज पाटील यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज पाटील यांनी केले, सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार वैशाली काळभोर यांनी मानले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0