मुंबईत स्तन कर्करोग तपासणी महाअभियानाला विक्रमी प्रतिसाद; २७,८६६ महिलांची तपासणी, Asia Book व India Book of Records मध्ये नोंद
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्तन कर्करोग तपासणी महाअभियानात एकाच दिवसात २९८ केंद्रांवर २७,८६६ महिलांची तपासणी करण्यात आली. या विक्रमी उपक्रमाची Asia Book of Records आणि India Book of Records मध्ये नोंद झाली.
मुंबई | ब्यूरो अनिल सावरे
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'बहीण लाडकी मुख्यमंत्र्यांची, घेऊ काळजी तिच्या आरोग्याची!' या विशेष स्तन कर्करोग तपासणी महाअभियानाला मुंबईकर महिलांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. एकाच दिवसात महानगरातील २९८ केंद्रांवर तब्बल २७ हजार ८६६ महिलांची स्तन कर्करोग तपासणी करण्यात आली. या विक्रमी कामगिरीची Asia Book of Records आणि India Book of Records मध्ये नोंद करण्यात आली.
या उल्लेखनीय यशाबद्दल महापौर श्रीमती रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढविणारे अभियान
महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या सन्मान सोहळ्याला आमदार अमित साटम, सभागृह नेते गणेश खणकर, शिवसेना गटनेते अमेय घोले, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, सुधार समिती अध्यक्षा संध्या दोशी सक्रे, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे, बाजार व उद्यान समिती अध्यक्षा हेतल गाला, नगरसेवक तेजिंदर तिवाना, भास्कर शेट्टी, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा लवंगारे, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
लवकर निदानामुळे उपचाराची संधी वाढते
महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, स्तन कर्करोगाचे वेळेवर निदान झाल्यास उपचार यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ३० वर्षांवरील प्रत्येक महिलेने नियमित आरोग्य तपासणी करावी आणि कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.
तपासणीत संशयित आढळलेल्या महिलांना पुढील मॅमोग्राफी व उपचारासाठी महानगरपालिका रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात येणार असून, त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
महाअभियानाच्या यशामागे आरोग्य यंत्रणेचे योगदान
सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधी, आरोग्य अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, आशा सेविका, निमवैद्यकीय कर्मचारी तसेच विविध वैद्यकीय संस्थांच्या सहकार्यामुळे एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात शिबिरांचे यशस्वी आयोजन शक्य झाले.
महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांतील डॉक्टर, सर्वसाधारण रुग्णालयांतील तज्ज्ञ, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) तसेच विविध स्थानिक वैद्यकीय संघटनांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेतला.
रक्तदाब, वजनासह प्राथमिक कर्करोग तपासणी
शिबिरांमध्ये महिलांची रक्तदाब, वजन आणि इतर प्राथमिक आरोग्य तपासण्यांसह स्तन कर्करोगाची प्राथमिक तपासणी करण्यात आली. ज्या महिलांना अधिक तपासणीची आवश्यकता होती, त्यांना मॅमोग्राफीसाठी महानगरपालिकेच्या विशेष रुग्णालयांकडे पाठविण्यात आले.
या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे मॅमोग्राफी सुविधा
महिलांसाठी पुढील तपासणीसाठी लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय (शीव), केईएम रुग्णालय, नायर रुग्णालय, टाटा कर्करोग रुग्णालय, अहिल्याबाई होळकर कॅन्सर रुग्णालय (भायखळा) तसेच महालक्ष्मी येथील CPAA (Cancer Patients Aid Association) येथे मॅमोग्राफीची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली.
महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती, वेळेवर निदान आणि उपचार यांना चालना देणारे हे महाअभियान मुंबईतील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरले असून, विक्रमी सहभागामुळे त्याची नोंद राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0