मुंबई पूरमुक्तीसाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाने समन्वयाने काम करावे – प्रभाकर शिंदे

मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबू नये आणि पूरस्थिती टाळण्यासाठी महानगरपालिका व रेल्वे प्रशासनाने समन्वयाने काम करण्याच्या सूचना स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिल्या. पूर्व उपनगरातील नालेसफाई आणि रेल्वे कल्वर्टच्या कामांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

May 18, 2026 - 22:58
 0  3
मुंबई पूरमुक्तीसाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाने समन्वयाने काम करावे – प्रभाकर शिंदे
मुंबई पूरमुक्ती, प्रभाकर शिंदे, बृहन्मुंबई महानगरपालिका

मुंबई, दि. १८ मे २०२६ :

मुंबईत पावसाळ्यात पाणी साचू नये आणि शहर पूरमुक्त राहावे यासाठी महानगरपालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाने परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले.

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबईतील नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू असून, पूर्व उपनगरांतील नालेसफाई व रेल्वे कल्वर्टच्या स्वच्छता कामांची प्रभाकर शिंदे यांनी रविवारी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी नालेसफाई, रेल्वे कल्वर्ट, पाणी उपसा करणारे उदंचन पंप आदी कामांचा आढावा घेतला.

मुलुंड (पूर्व) येथील नीलम नगर नाल्यावरील कल्वर्ट, नानेपाडा नाल्यावरील रेल्वे कल्वर्ट, उषानगर नाल्यावरील कल्वर्ट, कांजुरमार्ग (पश्चिम) येथील क्रॉम्प्टन नाल्यावरील कल्वर्ट, घाटकोपर (पूर्व) येथील गौरीशंकर वाडी नाला कल्वर्ट तसेच विद्याविहार (पूर्व) येथील जॉली जिमखाना नाल्यावरील रेल्वे कल्वर्टची त्यांनी पाहणी केली.

पाहणीदरम्यान नाल्यांमध्ये लोकवस्तीतून मोठ्या प्रमाणावर कचरा वाहून येत असल्याचे निदर्शनास आले. यावर उपाय म्हणून कल्वर्टच्या पातमुखाला मजबूत लोखंडी जाळ्या बसविण्याच्या सूचना त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिल्या. तसेच कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून पातमुख अधिक विस्तारित करण्यावर भर देण्यास सांगितले.

प्रभाकर शिंदे म्हणाले की, “सध्या सुरू असलेली नालेसफाई समाधानकारक असली तरी उर्वरित कामांना गती देणे आवश्यक आहे. महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाचा योग्य समन्वय राहिल्यास यंदा मुंबईत पाणी तुंबणार नाही.”

त्यांनी रेल्वेच्या केबल्स जमिनीपासून अधिक उंचीवर ठेवण्याच्या सूचनाही दिल्या, जेणेकरून वाहून येणारा कचरा त्यामध्ये अडकणार नाही.

या पाहणी दौऱ्यात स्थानिक नगरसेविका राखी जाधव, नगरसेवक धर्मेश गिरी, नगरसेविका डॉ. अर्चना भालेराव, उपप्रमुख अभियंता सुनीलदत्त रसाळ, संजय इंगळे तसेच मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता सचिन पांचाळ आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0