डबेवाल्यांच्या न्याय्य मागण्या मार्गी लावणार; नोंदणीकृत डबेवाल्यांना ₹२५ हजारांची वैद्यकीय मदत – महापौर रितू तावडे

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी डबेवाला संघटनेच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. नोंदणीकृत डबेवाल्यांना महापौर वैद्यकीय सहायता निधीतून ₹२५ हजारांची वैद्यकीय मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली.

Jul 28, 2026 - 19:25
 0  7
डबेवाल्यांच्या न्याय्य मागण्या मार्गी लावणार; नोंदणीकृत डबेवाल्यांना ₹२५ हजारांची वैद्यकीय मदत – महापौर रितू तावडे
मुंबई डबेवाले, रितू तावडे, बृहन्मुंबई महानगरपालिका, महापौर

मुंबई प्रतिनिधी | नरेश शिंदे 

मुंबई, दि. 27 : मुंबईतील डबेवाल्यांच्या विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिली. याचबरोबर नोंदणीकृत डबेवाल्यांना वैद्यकीय उपचारांसाठी महापौर वैद्यकीय सहायता निधीतून ₹२५ हजारांची आर्थिक मदत तत्काळ उपलब्ध करून देण्याची महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी केली.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशन (मुंबई डबेवाला संघटना) यांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.

यावेळी आमदार श्रीकांत भारतीय, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर, बाजार व उद्याने समिती अध्यक्षा हेतल गाला, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, उपआयुक्त प्रशांत गायकवाड तसेच डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके, रामदास करवंदे, सचिव किरण गवांदे, खजिनदार सुनील शिंदे, जयसिंग पिंगळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महापौर रितू तावडे म्हणाल्या की, मुंबईचे डबेवाले ही केवळ सेवा नसून मुंबईच्या श्रमसंस्कृतीचे महत्त्वपूर्ण प्रतीक आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास जगभरातील व्यवस्थापन संस्थांमध्ये केला जातो. त्यामुळे त्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण करणे ही महानगरपालिकेची सामाजिक जबाबदारी असून त्या विहित कार्यपद्धतीनुसार मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल.

बैठकीत डबेवाला संघटनेने विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यामध्ये वांद्रे (पश्चिम) येथील डबेवाला भवन महानगरपालिकेकडून निःशुल्क उपलब्ध करून देणे, आतापर्यंतचे भाडे माफ करणे, डबेवाला भवन परिसरातील रस्त्याला संघटनेचे संस्थापक कै. महादू हावजी बच्चे यांचे नाव देणे, प्रमुख रेल्वे स्थानकांजवळ स्वतंत्र आणि सुरक्षित सायकल पार्किंगची सुविधा निर्माण करणे, महानगरपालिका रुग्णालयांमध्ये नोंदणीकृत डबेवाल्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे तसेच चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळील डब्यांच्या देवाण-घेवाणीच्या ऐतिहासिक स्थळाचा 'मुंबई डबेवाला पर्यटक केंद्र' (Tourist Point) म्हणून विकास करण्याच्या मागण्यांचा समावेश होता.

यावेळी आमदार श्रीकांत भारतीय यांनी सांगितले की, सुमारे १३० वर्षांची परंपरा लाभलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांनी आपल्या विश्वासार्ह सेवेने जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. वारकरी परंपरेशी जोडलेल्या या संघटनेचा वारसा जपण्यासाठी आणि भावी पिढीला सक्षम करण्यासाठी महानगरपालिकेने सर्वतोपरी सहकार्य करावे.

बैठकीच्या शेवटी महापौर रितू तावडे यांनी डबेवाला संघटनेच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागांमार्फत त्यांचा पाठपुरावा केला जाईल, असे स्पष्ट केले. तसेच नोंदणीकृत डबेवाल्यांना महापौर वैद्यकीय सहायता निधीतून ₹२५ हजारांची वैद्यकीय मदत देण्याच्या निर्णयामुळे डबेवाला बांधवांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.