मुंबईला दिलासा! पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला; जलसाठा ६१.९० टक्क्यांवर

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव २२ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.५१ वाजता ओसंडून वाहू लागला. सात तलावांपैकी तीन तलाव भरले असून एकूण जलसाठा ६१.९० टक्क्यांवर पोहोचला आहे.

Jul 22, 2026 - 19:59
 0  10
मुंबईला दिलासा! पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला; जलसाठा ६१.९० टक्क्यांवर
तानसा तलाव, मुंबई पाणीपुरवठा, मुंबई तलाव, तानसा धरण, जलसाठा, विहार तलाव,

मुंबई | प्रतिनिधी : नरेश शिंदे 

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव आज (२२ जुलै २०२६) सकाळी ८ वाजून ५१ मिनिटांनी पूर्ण भरून ओसंडून वाहू लागला आहे. ही माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली.

यंदाच्या पावसाळ्यात भरून वाहणारा तानसा हा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तिसरा तलाव ठरला आहे. यापूर्वी ७ जुलै २०२६ रोजी रात्री ९ वाजता विहार तलाव, तर त्याच दिवशी रात्री ११.४३ वाजता तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता. त्यामुळे आता सातपैकी तीन तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व जलाशयांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आज सकाळी ६ वाजता झालेल्या नोंदीनुसार मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व सात तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या ६१.९० टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेला तानसा तलाव हा देशातील मोजक्या दगडी बांधकामाच्या धरणांपैकी एक मानला जातो. या तलावाची कमाल जलधारण क्षमता १४,५०८ कोटी लिटर (१,४५,०८० दशलक्ष लिटर) इतकी आहे.

गतवर्षांच्या तुलनेत यंदाही वेळेवर भरला तानसा तलाव

गेल्या काही वर्षांतील तानसा तलाव भरल्याच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत:

२०२५: २३ जुलै, सायं. ५:४०

२०२४: २४ जुलै, पहाटे ४:१६

२०२३: २६ जुलै, पहाटे ४:३५

२०२२: १४ जुलै, रात्री ८:५०

२०२१: २२ जुलै, पहाटे ५:४८

२०२०: २० ऑगस्ट, सायं. ७:०५

यंदा तानसा तलाव २२ जुलै रोजीच भरल्याने मुंबईच्या पाणीपुरवठ्याबाबत मोठा दिलासा मिळाला असून, पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास उर्वरित तलावही लवकरच भरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0