नशामुक्त मुंबई अभियानाचा ३० जुलै रोजी शुभारंभ; युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन
महाराष्ट्र शासनाच्या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा ३० जुलै रोजी वरळीतील एनएससीआय डोम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ होणार असून, युवकांनी व नागरिकांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.
मुंबई प्रतिनिधी | देवानंद शिंदे
मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ गुरुवार, दि. ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता वरळी येथील एनएससीआय डोम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
या अभियानात मुंबईकरांनी, विशेषतः युवक-युवती आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन नशामुक्त समाज घडविण्यासाठी प्रतिज्ञा घ्यावी, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.
नशामुक्त मुंबई अभियानांतर्गत वर्षभर विविध स्तरांवर जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. अमली पदार्थांच्या विळख्यात युवक सापडू नयेत, तसेच समाजात नशामुक्तीबाबत व्यापक जनजागृती व्हावी, या उद्देशाने शासनाने ही मोहीम हाती घेतली आहे.
‘अमली पदार्थांना नकार द्या, जीवनाला होकार द्या’ हा अभियानाचा संदेश
या अभियानाच्या माध्यमातून मुंबईतील शाळा, महाविद्यालये, समुपदेशक, पालक आणि विविध सामाजिक संस्थांना एकत्र आणून अमली पदार्थांविरोधात व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.
प्रत्यक्ष कार्यक्रमासोबतच शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी ऑनलाइन माध्यमातूनही सहभागी होणार आहेत. या अभियानात अमली पदार्थांच्या सेवनास प्रतिबंध, समुपदेशन आणि सकारात्मक जीवनमूल्यांचा प्रसार यावर विशेष भर दिला जाणार आहे.
‘अमली पदार्थांना नकार द्या, जीवनाला होकार द्या’ हा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविणे आणि युवकांना निरोगी, सुरक्षित व जबाबदार जीवनशैलीकडे प्रेरित करणे, हे अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याशिवाय बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, कोकण विभागीय आयुक्त रूबल अग्रवाल, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, अमली पदार्थांच्या विळख्यात युवक सापडू नयेत आणि समाजात नशामुक्तीबाबत प्रभावी जनजागृती व्हावी, यासाठी शासनाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या अभियानाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, नागरिक आणि समाजातील विविध घटकांना एकत्र जोडून नशामुक्त मुंबईचे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे.
नशेच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक राहणे आवश्यक आहे. सुरक्षित, निरोगी आणि सशक्त मुंबई घडविण्यासाठी नागरिकांनी या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही मंत्री लोढा यांनी केले आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1