नशामुक्त मुंबई अभियानाला व्यापक प्रतिसाद; ४ हजारांहून अधिक शाळा-महाविद्यालयांत समुपदेशन समित्या
नशामुक्त मुंबई’ अभियानांतर्गत मुंबईतील ४ हजारांहून अधिक शाळा व महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन आणि समुपदेशन समित्या स्थापन करण्यात आल्या असून, एक हजारांहून अधिक प्रशिक्षित समुपदेशकांचे जाळे उभारण्यात आले आहे.
प्रतिनिधी नरेश शिंदे
मुंबई : स्वयंसेवी संस्था आणि समाजातील प्रत्येक घटकाने मुलांचे सुरक्षित व व्यसनमुक्त भविष्य घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासन विविध उपक्रम राबवत असून, येत्या १५ ऑगस्टपासून ‘सीएम महाधन’ कौशल्य विकास योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील एक लाख युवक-युवतींना विविध क्षेत्रांतील कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच स्वयंरोजगारासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि विविध प्रकारचे सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
व्यापक जनजागृतीसाठी समुपदेशन यंत्रणा
प्रास्ताविकात मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाची सविस्तर माहिती दिली. केंद्र शासनाने २०२९ पर्यंत ‘ड्रग फ्री देश’ हे उद्दिष्ट निश्चित केले असून, या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी व्यापक जनजागृती, प्रभावी समुपदेशन आणि विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मुंबईतील शाळा व महाविद्यालयांमध्ये चार हजारांहून अधिक मार्गदर्शन आणि समुपदेशन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन व मानसिक आधार मिळावा यासाठी एक हजारांहून अधिक प्रशिक्षित समुपदेशकांचे जाळे उभारण्यात आले आहे.
‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाच्या शुभारंभप्रसंगी चार हजारांहून अधिक शाळा व महाविद्यालयांतील पाच लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी, पालक आणि नागरिक मुख्यमंत्री यांच्या ऑनलाइन संवादात सहभागी झाले होते. या व्यापक सहभागातून व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत असल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नशामुक्त मुंबई’ अभियानासाठी पाठविलेला संदेश मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी वाचून दाखविला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ट्रेनिंग मॅन्युअल फॉर कौन्सेलर्स’ या समुपदेशकांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रशिक्षण पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी शाळा, महाविद्यालये, पालक, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1