मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांचा दुर्गम गावांत आढावा; पेठच्या राजबारी व भुवन गावांना भेट
मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी पेठ तालुक्यातील महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील राजबारी व भुवन या दुर्गम गावांना भेट देऊन मतदारांशी संवाद साधला तसेच मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
नाशिक | ब्युरो :
भारत निवडणूक आयोगाच्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी आज पेठ तालुक्यातील महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील राजबारी आणि भुवन या दुर्गम गावांना भेट देऊन मोहिमेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.
मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली तसेच प्रगणना अर्ज भरून घेण्यासाठी नागरिकांना मदत केली. याशिवाय गावातील विकासकामे, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि स्थानिक नागरिकांच्या समस्या यांचीही त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली.
या दौऱ्यात पेठ-दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे, पेठचे तहसीलदार शिवाजी गवळी, मंडळ अधिकारी शिवाजी भोये, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब भुरकुड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील बागुल, गटशिक्षण अधिकारी नामदेव मौळे, बाजार समितीचे संचालक भास्कर गावित तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भुवन येथील शासकीय आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या निवास, शिक्षण, भोजन व्यवस्था आणि आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी आवश्यक सुधारणांसाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
दौऱ्याच्या पुढील टप्प्यात दिंडोरी उपविभागीय कार्यालयात आयोजित तालुकास्तरीय बैठकीत जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या प्रगतीचा तसेच महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीस उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे, दिंडोरीचे तहसीलदार मुकेश कांबळे, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे तसेच महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम अत्यंत महत्त्वाची आणि कालबद्ध असल्याने भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या मुदतीत सर्व कामे प्रभावी नियोजनासह काटेकोरपणे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0